झळा आखातातील युद्धाच्या आणि उष्म्याच्या

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये असाच खेळ करत तेथील राष्ट्राध्यक्षांचे त्यांच्या पत्नीसहित अपहरण करून व्हेनेझुएलावर ताबा मिळवला. इराणने मात्र इस्रायल-अमेरिकेचा अंदाज चुकवला. इराण या दोघांना कडवट झुंज देत आहे. आखाती प्रदेश हा व्यापारी दृष्टीने, तसेच कच्च्या तेलाबाबत अतिशय महत्त्वाचा प्रदेश आहे. यामुळेच जगाचे अर्थकारण, व्यापार मोठ्या प्रमाणावर या प्रदेशावर अवलंबून आहे. आता दिवसेंदिवस युद्ध लांबत चालले आहे. त्याचा विपरीत परिणाम तेलपुरवठा, तसेच अन्य वस्तूंवर होत आहे. इतर देशांबरोबर तो भारतातदेखील जाणवू लागला आहे. स्वयंपाकाचा घरगुती तसेच व्यापारी गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासू लागला आहे. गॅसच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. तेल, इंधन यावर अजून परिणाम झालेला नसला, तरी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला आहे. पेट्रोलपंपांवर गर्दी वाढत आहे. अगोदरच महागाईचा आगडोंब उसळलेला असताना युद्धाने त्यात भर पडत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला जगायचे कसे, असा प्रश्न पडू लागला आहे. इंधन, गॅसच्या किमती वाढल्या तर त्याचा विपरीत परिणाम वाहतूक खर्च, अन्य चीजवस्तू यावर होतो. एकीकडे मर्यादित उत्पन्न आणि वाढता खर्च याचा ताळमेळ बसत नाही. त्यात भर पडली ती युद्धाची. यातून मार्ग कसा काढायचा, ही आपल्या सर्वांची चिंता आहे. यातच भर पडली आहे ती शेतकर्‍यांचा शेतमाल कंटेनरमध्ये पडून आहे. नाशवंत शेतमाल आता सडू लागला आहे. कंटेनर खाली करा किंवा शेतमाल परत घेऊन जा, असा तगादा लावला जात आहे शिपिंग कंपन्यांनी वॉर शिपिंग सरचार्ज लावला. याचा शेतकर्‍यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. कोल्ड स्टोअरेज भरले आहेत. न्हावा-शेवा बंदरात हजारो कंटेनर अडकून पडले आहेत आणि कंटेनरमालक कंटेनर रिकामा करण्याचा तगादा लावत आहेत. भाजीपाल्याचे भाव पडले. रत्नागिरीमध्ये गॅससाठी रांगा लागल्या आहेत. देशभर परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. व्यापारी गॅस बुकिंग बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेले बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांच्या उत्पादनांवर विपरीत परिणाम होऊ लागली आहे. हवाई वाहतूकदेखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता केंद्र सरकारने एस्मा कायदा लागू केला आहे. मात्र, त्याची प्रभावी आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. या सगळ्यात जनता पॅनिक झाली आहे. सगळ्यांचेच अर्थकारण बिघडणार आहे. रोजगारावर परिणाम होऊ लागला आहे. आता केंद्र सरकारदेखील अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खात्यांना निर्देश दिले आहेत.
या सगळ्यांत सरकारचे दावे काही प्रमाणात खोटे ठरू लागले आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असताना या गंभीर विषयावर चर्चा व्हावी, अशी विरोधकांनी मागणी केली तर लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावावर चर्चा करावी यासाठी सत्ताधारी पक्ष अडून बसला. देशात गंभीर संकटकाळ असतानाही सरकार आणि विरोधक हे केवळ भांडत बसले आहेत. वास्तविक परिस्थितीचे भान ठेवून याबाबत ’सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास’ अशा पद्धतीने संसद आणि सरकार चालले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने तसे होत नाही.
एकीकडे युद्धाच्या झळा सगळ्यांना जाणवू लागल्या आहेत, तर दुसरीकडे होळीचा सण साजरा होताच सूर्यदेव कोपण्यास सुरवात झाली आहे. हवेतील उष्णता वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी तापमान वाढू लागले आहे. यावर्षी तापमान जास्त राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाढत्या तापमानाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तुमची-आमची चिंता वाढविणार. आतापासूनच सुरू झालेली अंगाची लाही-लाही जून -जुलैपर्यंत सहन करावी लागणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अशातच वीजबिलेदेखील वाढतील. नाशिक, पुण्यासारख्या परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. एकूणच ’झळा ’त्या’ युद्धाच्या आणि उन्हाच्या’ आता चांगल्याच बसू लागल्या आहेत. एकूणच येणारा काळ सगळ्यांसाठीच कसोटीचा ठरणार आहे.

The Gulf War and the heat

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *