नाशिक : प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसंधी झाली असली, तरी संरक्षण विभागातर्फे संरक्षणाची सर्व प्रक्रिया सुरूच ठेवण्यात आली आहे. त्याअंतर्गत रविवारी (दि.11) सायंकाळी सात वाजता शहरात एकाच वेळी 198 भोंगे वाजवण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा काम करते की नाही, याची चाचणी घेण्यासाठी हे भोंगे वाजविण्यात आले. याशिवाय नागरी संरक्षण दलाचे सात भोंंगे सकाळी 9 वाजताही वाजविण्यात आले. मात्र, अगदी जवळच्या परिसराचा अपवाद वगळता नागरिकांना त्याचा आवाज ऐकूच आला नाही. अशी परिस्थिती असल्याने जर संकट आलेच तर नागरिक कसे सावध होणार, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला
आहे.
शहरात रविवारी (दि. 11) सकाळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठक घेतली. तीत सूचना देत सायंकाळी सात वाजता ही चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नागरी संरक्षण दलाचे सात आणि स्मार्ट सिटीचे 213 अशा एकूण 220 भोंग्यांची चाचणी घेण्यात आली. त्यात पावसामुळे स्मार्ट सिटीचे 28 भोंगे सोडून इतर सर्व भोंगे सुमारे 10 सेकंदांसाठी वाजविण्यात आले.