इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा
इंदापूर :
पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल इंदापूर येथे पार पडला. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
स्वर्ग सुखाची अनुभूती देणारा अवस्मरणीय रिंगण सोहळा रविवारी (दि.29) इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात भाविक भक्तांनी अनुभवला. मालोजीराजेंची भूमी असलेल्या इंदापुरात पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार श्वेता महाले, माजी आमदार विलास लांडे, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, महारुद्र पाटील, राजवर्धन पाटील, कैलास कदम, पोपट शिंदे, धनंजय बाब्रस यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी, नागरिक विविध खात्याचे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला नगारखाना, मानाच्या आश्वांनी प्रदक्षिणा केली. तदनंतर टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने, अनोख्या चैतन्य व भक्तिरसाने प्रफुल्लित झालेल्या वातावरणात झेंडेकरी,तुळशी- वृंदावन धारक महिला, टाळकरी, विणेकरी, पोलीस धावले. विश्वस्त आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात आली. यानंतर दोन्ही मानाच्या अश्वांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
अश्वाचे दुसरे रिंगण
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आगमन झाल्यानंतर मैदानात आधी तुळशी वृंदावन घेऊन आलेल्या महिला, झेंडेकरी, विणेकरी, पोलीस बंदोबस्तात अग्रेसर असलेलं पथक आणि त्यानंतर मानाचे अश्व दाखल झाले.