सण-उत्सवांत फुलांचे महत्त्व वाढले; भावही वधारले

नाशिक ः रेणुका गायकवाड
एकेकाळी गुलशनाबाद म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिक शहराची अद्याप फुलांचे शहर म्हणून ओळख आहे. शहरात जवळपास चार कोटींहून अधिक उलाढाल फुलविक्रीतून होते. सध्या गणेशवाडीत
फूल बाजार भरतो. त्यात अनेकांना रोजगार मिळाला आहे. फुलांच्या वाढीसाठी परिसरात पोषक वातावरणही आहे. त्यामुळे अद्याप फूल बाजाराचे महत्त्व अबाधित आहे. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात
असलेला हा बाजार आता चांगलाच फोफावला आहे. सध्या श्रावण महिना सुरू असून, सण-उत्सवांच्या काळात फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. त्याचबरोबर भावही वाढले आहेत.

फूल बाजारात गुलाबापासून सर्वच प्रकारची फुले उपलब्ध होतात. त्यामुळे खरेदीसाठी भल्या पहाटेपासून गर्दी उसळते. सणासुदीच्या काळात या गर्दीत मोठी वाढ होते. या काळात गुलाबाच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ होते. पांढरी बिजली, पिवळी बिजली, मखमल, अस्टर, पिवळी व पांढरी शेवंती, गुलाब, गुलछडी यांच्याही भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फुलांच्या हाराच्या किमतीतही दुप्पट वाढ झाली आहे.
हा महिना सणांचा असल्याने सर्व फुलांचे महत्त्व अधिक असते. गुलाब, मोगरा, शेवंती, झेेंडू आदी विविध प्रकारच्या फुलांनी लोक पूजाविधी, तसेचे देवालये सजवतात. फुलांमुळे देव्हारा व मंदिरे आकर्षक दिसतात. त्यामुळे विविध फुलांची बाजारात चांगली विक्री होत आहे. बाजार फुलांच्या सुगंधाने बहरला आहे. त्यातच फुल बाजारात झेंडूला जास्त प्रमाणात मागणी आहे. यंदा पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने फुलांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे फुलांची आवक कमी आहे.
फुलांच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे. कारण मोगर्‍याचा गजरा, फुलांच्या माळा, फुलांचे तोरण आणि मंदिरे, मूर्ती सजवताना फुलांचा वापर केला जात आहे.
सध्या प्लास्टिकच्या फुलांनादेखील मागणी आहे. प्लास्टिकच्या
फुलांचा उपयोग विविध मंदिरांत तोरण लावण्यासाठी केला जातो. बाजारात प्लास्टिकच्या फुलांच्या माळा विक्रीस आल्या आहेत. त्याचबरोबर विविध रंगांचे आकर्षक तोरणदेखील विक्रीला आले आहेत. गणेशोत्सवासाठी सर्व भाविक प्लास्टिकच्या फुलांची खरेदी करत आहेत. प्लास्टिक फुलांचे डेकोरेशन करण्याचे प्रमाण वाढले आहे.

बाजारात विविध फुलांचे दर
झेंडू – 500 रुपये किलो
गुलाब – 50 ते 60 रुपये गुच्छ
शेवंती – 200 रुपये किलो
जास्वंदी – 50 रुपये किलो

 

नाशिकला मंदिरांचा वारसा असल्याने गोदाकाठावर अनेक मंदिरे आजही सुस्थितीत उभी आहेत. त्यामुळे साहजिकच पूजाविधीसाठी फुले वाहण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आमच्याकडे दूरवरून अनेक ग्राहक फुले घेण्यास येतात. फुलांच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 20 टक्क्यांनी भाववाढ झालेली आहे.
– सुनीता गाडेकर, फूल विक्रेती

श्रावणातील प्रत्येक सणाच्या वेळी आमच्याकडे फुले खरेदीसाठी महिला व पुरुषांची गर्दी असते. लोक पूजेसाठी फुले घेतात. काही जण मंदिरातील मूर्तीसाठी व घरच्या देवासाठी, तसेच सजावटीसाठी फुले घेऊन जातात
– कमल रुनासे, फूल विक्रेती

प्लास्टिकच्या फुलांची सध्या खूप विक्री होत आहे. नागरिक ही फुले जास्त प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या नैसर्गिक फुलांची विक्री करणार्‍यांचे नुकसान होत आहे. ग्राहकांनी नैसर्गिक फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी करावी.
– शेखर रुनासे, फूल विक्रेता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *