केंद्रास लावले कुलूप; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
दिंडोरी ः प्रतिनिधी
वरखेडा (ता. दिंडोरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अपघात झालेल्या जखमी व्यक्तीवर उपचारात
हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी आरोग्य केंद्रास कुलूप लावून निषेध व्यक्त केला. संबंधित वैद्यकीय अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी, फकिरा भिका कासे (वय 42, रा.जानोरी, ता. दिंडोरी) हे दुचाकीने (एमएच 15, 9036) जात असताना वरखेडा गावाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून त्यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकारी लखमापूरला गेल्याची माहिती मिळाली. दोन पारिचारिका उपस्थित होत्या. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. खोकले यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून सरपंच केशव वागले यांनी रुग्णवाहिकेची मागणी केली. रुग्णवाहिकेचा चालक गावी गेला असून, गाडीची चावीही घेऊन गेल्याचे समजले. याबाबत जागृत नागरिकांनी तालुका आरोग्याधिकार्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. तासभर वाट पाहूनही रुग्णवाहिका आली नाही. दरम्यान, डॉ. खोकले प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. तोपर्यंत फकिरा कासे यांची प्रकृती अधिकच खालावली होती. उपचारासाठी उशीर झाला. अधिक उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे वेळेत उपचार न झालेल्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला. स्थानिकांनी वैद्यकीय अधिकार्यांना गराडा घालून जाब विचाराला; परंतु त्यावेळी वणी पोलिस घटनास्थळी आले. स्थानिक सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व नातेवाइकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप लावून निषेध व्यक्त केला.
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड
वरखडे प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत.
तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असताना,
एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला.
परंतु, भोंगळ कारभारात निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याने
संताप व्यक्त होत आहे.
याबाबत वैद्यकीय अधिकार्यांवर काय कारवाई होते,
याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.