आस्वाद

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार

भारत हा विकसनशील देश आहे. अवघ्या सत्तर एक वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला सुरुवातीलाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखा पंतप्रधान लाभल्यामुळे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती करू शकलो. त्यांच्या दूरदृष्टीची फळे आपण आजही चाखत आहोत. काळानुरूप विषय बदलत असतात. त्यानुसार सध्याच्या काळातला परवलीचा शब्द झाला आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). जगातल्या अनेक देशांनी व ज्यांनी याचा सुरुवातीपासून विकास केला त्या अमेरिकेने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.

आपल्याला या क्षेत्रात अद्याप मोठी प्रगती करायची असल्यामुळे आपल्या देशातील तंत्रज्ञ आणि विज्ञानप्रेमी याबाबतीत अधिक अभ्यास करत आहेत. जे देशाच्या बाहेर काम करत आहेत त्यांनी या क्षेत्रात चांगलीच प्रगती केली आहे. जगाच्या या नव्या गोष्टींचा आपल्या देशात प्रसार व्हावा म्हणून आणि एपस्टीन फाइल्समुळे गेलेल्या प्रतिमेला थोडे फार सावरता यावे, या उद्देशाने भारताने नवी दिल्लीत एआय समीट भरवले. त्याचा फायदा परदेशातील अनेकांना झाला. आपल्या देशात मात्र गलगोटियाने या सार्‍या प्रयत्नांवर पाणी फिरवले. या समीटच्या यशापेक्षा त्या ठिकाणी गेलेल्या व या विषयाशी काहीही संबंध नसलेल्या मंत्र्यांच्या भाषणाने भाजपाने हे समीट आपले करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरले. राज्यासाठी तर एक मोठी गंमत झाली. ज्यावेळी आपले मुख्यमंत्री या एआय समीटमध्ये शेतीविषयक मोठमोठी विधाने करत होते तेव्हा त्यांच्याच खात्याच्या पोलिसांनी शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकर्‍यांचे दमन सुरू केले होते.
भारतासारख्या देशात एआय समीट होणे ही खरोखर आनंदाची गोष्ट होती. त्यामुळे आपल्या देशातील तरुणांना दिशा मिळू शकणार होती. त्यांना जागतिक स्तरावर त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळणार होती. त्यातून भारत सरकारलाही देशातल्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी परदेशी मदत मिळणार होती. असे असतानाही हे समीट त्याच्या यशस्वितेपेक्षा त्याच्या इतर गोष्टींनी गाजले. त्यामुळे अखेर सरकारला त्याचा लाभ होण्याऐवजी उलटे नुकसान झाले. ज्या समीटमुळे भारत सरकारचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावायला हवे होते त्याच समीटमुळे परदेशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नामुष्की सहन करण्याची वेळ आपल्यावर आली. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या समीटमध्ये सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा फटका बसला. ही परिषद का फसली, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय समीटच्या यशस्वितेचा एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे, हेतूची शुद्धता. अशा प्रकारचे कार्यक्रम मिशन स्टेटमेंटने आयोजित करावे लागतात. त्यात आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे स्पष्ट असावे लागते. यासाठी लागणारा प्रचंड पैसा पाहता त्याची यशस्विता आणि आपल्या देशातील तरुणांना त्याचा नेमका किती आणि कसा फायदा होणार याची आकडेवारीनुसार योजना तयार करावी लागते. या समीटचा हेतू का कोण जाणे आपल्या देशातील तरुणांसाठी नव्हता. त्यांना तशा प्रकारे तयार करण्यात आले नव्हते. त्यांना प्रोत्साहन देण्यात आले नव्हते. उलट अशा गोष्टींचा फायदा उचलण्याची संधी गलगोटियासारख्या धंदेवाईक संघटनांना देण्यात आली. गलगोटियाने चिनी कुत्रा आपला का म्हटले, तर केवळ आपल्या विद्यापीठाचे पुढच्या वर्षांचे प्रवेश वाढवण्यासाठी आणि त्यातून पैसा कमावण्यासाठी. अगदी या गलगोटिया विद्यापीठाकडे कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील एकही प्राध्यापक दिसला नाही. जी काही प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्यातील एका व्यवस्थापनाच्या मर्जीतल्या बाईने. त्यांनी केवळ त्यांचा धंदा पाहिला. उद्याची स्वप्ने पाहून आपल्या गळाला काही मुले लागतील एवढाच त्यांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांना अखेर इतके अपमानित व्हावे लागले. आयोजकांनाही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला. वास्तविक त्यांच्यावर देशाची प्रतिमा खराब केल्याबद्दल दंडात्मक कारवाई व्हायला हवी होती. मात्र, आपल्या देशाचे सध्या असे स्वरूप आहे की, आपल्या देशाची प्रतिमा उंचावणारे सोनम वांगचुक यांच्यासारखे संशोधक तुरुंगात आहेत आणि गलगोटिया आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करत आहे.
गलगोटियामुळे या सार्‍या प्रदर्शनातील ज्या वस्तू भारतीय म्हणून मांडण्यात आल्या आहेत त्या सार्‍या चिनी आहेत की काय, असा एक भ्रम निर्माण झाला. त्यामुळे पुढे सर्वच गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासून घ्यायला सुरुवात झाली. या समीटचा वापर पंतप्रधानांची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी करण्यात आला. त्यासाठी त्यांनी तिथे तब्बल सहा तास फोटोशूट केले. या फोटोशूटमुळे त्यांची आणि समीटची प्रतिमा उंचावण्यापेक्षा समाजमाध्यमांवर त्याचे हसे झाले. एकीकडे सरकारी पातळीवर पंतप्रधान तिथे गेल्याचे दिसले, तर दुसरीकडे तिथल्या आयोजनाची लक्तरे समाजमाध्यमांवर लटकवण्यात आली. त्यांनी तिथे जाऊन सुरू असलेल्या स्टॉलना भेटी द्यायला हव्या होत्या. लोकांशी संवाद साधायला हवा होता. त्याऐवजी त्यांनी तिथल्या सगळ्यांना बाहेर काढले. त्यांच्या सुरक्षेची कारणे देत तिथे कोणीही व्यक्ती नव्हती. मग नेमके फोटोशूट कशामुळे झाले? हा प्रयोग फसल्यानंतर मग एका-एका मंत्र्याला तिथे पाठविण्याची टूम निघाली. त्या-त्या क्षेत्रात काही धंदा होतो का, हे पाहण्यासाठी हे करण्यात आले. या मंत्र्यांनीही फारसा प्रभाव पाडला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही तिथे गेले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी त्यांचे सरकार एआयच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांचे कसे भले करणार याच्या कथा वाचत होते त्याचवेळी त्यांच्या धंद्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी समृद्ध आणि शेतीत नवनवे प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांवर दडपशाही करण्यात येत होती. गावातील लोकांपेक्षा अधिक पोलीस जाऊन या गावकर्‍यांवर आणि गावातील बायाबापड्यांवर अत्याचार करत होते. इथे एआयच्या आणि आधुनिक चर्चा रंगत होत्या त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील तांत्रिक मर्यादा उघड पडत होत्या.
वास्तविक पाहता या सरकारने आणि आपल्याही मुख्यमंत्र्यांनी अशा समीटमध्ये वेळ घालवण्यापेक्षा कुंभमेळ्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. खरा धंदा हा इथे आहे. तिथे ज्यांना व्यवसाय करायचा होता ते व्यवसाय करून निघून गेले. अनेक देशांच्या आणि कंपन्यांच्या प्रमुख अधिकार्‍यांनी आपापल्या कंपन्यांसाठीचे करार योग्य पद्धतीने केले. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाच्या व्यवसायासाठी जागा आहे. देशाच्या गेल्या सत्तर वर्षांच्या प्रगतीमुळे आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ पंतप्रधान आपल्याला जागतिकीकरणाच्या काळात लाभल्यामुळे या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे त्या पुण्याईवर अनेकांनी या एआय समीटमध्ये आपापले करार करून घेतले. भारतालाही अमेरिकेबरोबर एक वेगळा करार करता आला. जर एआय समीटचे आयोजन चांगल्या प्रकारे झाले असते तर ती खरोखर यशस्वी झाली असती, अशी चुटपूट मात्र सार्‍यांना लागून राहिली.

The invention of artificial intelligence

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

1 hour ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

1 hour ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

1 hour ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

2 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

2 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

2 hours ago