रक्षाबंधनानिमित्त आकर्षक राख्यांनी सजली बाजारपेठ

नाशिक : मोहिनी जाधव
रक्षाबंधनानिमित्त शहरातील बाजारपेठ आकर्षक राख्यांनी सजली आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात येणारा हा सण सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. रक्षाबंधन केवळ एक सण नाही, हा बहीण-भावाच्या नात्याचा, आपुलकीचा आणि सुरक्षिततेचा धागा आहे.

 

 

 

रक्षाबंधनाचा पवित्र सण आज, शनिवारी (दि.9) साजरा होणार असला, तरीही राख्या आप्तांना पाठविण्यास गेल्या आठवलड्यात सुरुवात झाली होती. बाजारात बच्चेकंपनीसाठी मोटू पतलू, टारझन, स्पायडरमॅन, तर युवकांसाठी जरीची, चंदनाची, मोती आणि नाण्याची राखी या नवीन प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. विविध नक्षीकाम केलेल्या राख्या आणि जरीच्या राख्या दिल्ली, मुंबई येथून मागवल्या जातात. या राख्या ग्राहकांचे खास आकर्षण आहे.

या राख्यांची किंमत नक्षीकामानुसार आहे. सराफांकडे चांदीच्या व सोन्याचा मुलामा असलेल्या राख्यांवर रुद्राक्ष, विविध रंगाचे खडे, तसेच गणेश, लक्ष्मीदेवतेचे फोटो आहेत. सुवर्ण रंगामुळे या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. राख्या अनेक राज्यांमध्ये कुरिअरने, रेल्वेने आणि पोस्टानेसुद्धा
पाठवल्या जातात.
रक्षाबंधन या सणाची उत्पत्ती प्राचीन कथांमध्ये आढळते. एका प्रसिद्ध कथेनुसार, द्रौैपदीने श्रीकृष्णाच्या बोटाला झालेल्या जखमेवर आपल्या साडीचा पदर बांधला होता, ज्यामुळे कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. तेव्हापासून हा सण भारतात साजरा केला जातो, असे म्हटले जाते. भारतातील सर्वच राज्यांत हा सण पारंपरिक पद्धतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. रक्षाबंधन सण बहीणभावाचा नात्याला अजून
घट्ट करतो.
या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून त्याचे आयुष्य निरोगी आणि सुरक्षित राहावे, यासाठी प्रार्थना करते, तसेच भाऊदेखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. तसेच समाजात आपली बहीण ताठमानेने वावरावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे
घेतो.
बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना करते.

राख्यांना सोन्या-चांदीचा मुलामा

टिकाऊ आणि स्वदेशी बनावटीच्या राख्या दहा रुपयांपासून 300 रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत. सोने आणि चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांनाही मागील काही वर्षांपासून मागणी वाढली आहे. यंदा सगळ्यात जास्त धाग्यात गुंफलेल्या राख्यांचा बोलबाला आहे. अ‍ॅक्रेलिक आणि लायटिंग या दोन प्रकारांतही राख्या उपलब्ध आहेत. अ‍ॅक्रेलिकला सोनेरी रंग असणारी आणि राखीवर कोरलेल्या शब्दाने त्याचे व्यक्तिमत्त्व सांगणारी सोन्याची राखी बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *