246 पालिका, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान
मुंबई :
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या मतदानाच्या तारखा काल निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी कालपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत समित्या, 246 नगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण एक कोटी 7 लाख तीन हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कंट्रोेल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
गुलाबी मतदान केंद्र
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन बनवण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दिव्यांग मतदार, तान्ह्या बाळासह स्त्रिया, ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करू दिले जाईल. तसेच काही मतदार केंद्र गुलाबी केंद्र असणार असून, त्यात सर्व अधिकारी महिला असतील.
नगरसेवक- 2 लाख 25 हजार
मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक
♦ नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर 2025
♦ अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
♦ छाननी – 18 नोव्हेंबर
♦ अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
♦ निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
♦ मतदान – 2 डिसेंबर 2025
♦ निकाल – 3 डिसेंबर 2025
एकूण मतदार?
♦ एकूण मतदार – एक कोटी 7 लाख 3 हजार 576
♦ महिला मतदार – 53 लाख 22 हजार 870
जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांचा समावेश
नाशिक : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने काल राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार विभागात 49 पालिका असून, त्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या निवडणुका होणार असल्याने स्थानिक नेतृत्वाबरोबरच लोकप्रतिनिधींचाही कस लागणार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणानंतर होत असलेल्या या निवडणुकांत महायुतीबरोबरच महाविकास आघाडीच्या मंडळींच्याही अस्तित्वाची लढाई रंगणार आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. न्यायालयाने 31 जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता पहिल्या टप्यात नगरपालिकांनंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर माहापालिका निवडणुका होतील असे सांगण्यात येत होते.
या पालिकांसाठी मतदान
मनमाड नगर परिषदेत 33, तर येवला नगर परिषदेत 26 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सिन्नर- 30, ओझर- 27, पिंपळगाव बसवंत -25, चांदवड- 20, इगतपुरी -21, सटाणा – 24, भगूर-20, त्र्यंबकेश्वर-20 आणि नांदगावनगर परिषदेत 20 नगरसेवक निवडले जाणार आहे. यात 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.