देवांचा देव महादेवाची रात्र-महाशिवरात्र

हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांचे महात्म कथा-पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. या सर्वांमध्ये अग्रणी स्थान मानल्या गेलेल्या भोलेनाथ, शंभुनाथ, नीळकंठ, शंकर, त्रिनेत्र, रूद्र, महेश, दीनानाथ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या देवांचा देव, तिन्ही लोकांचा स्वामी तो महादेव. महाशिवरात्र आणि शंभू महादेव यांची सांगड घालायची म्हणजे, हिंदू तिथी पंचांगानुसार दरवर्षी माघ कृष्ण चतुर्दशी या दिवसाच्या रात्रीला महाशिवरात्र म्हणून संबोधले जाते.
तर उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. तमोगुणांचे हलाहल प्राशन करणारे भगवान शंकर हे पृथ्वीच्या अधिक जवळ येतात, मात्र या दिवशी ते विश्रांती घेतात. त्यामुळे महादेवाचा आवडता दिवस म्हणून महाशिवरात्र ओळखली जाते. या दिवशी समस्त हिंदू बांधव शंकराच्या मंदिरात जाऊन भक्तिभावाने दर्शन घेतात, दिवसभर उपवास करतात. या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने शंभू महादेव प्रसन्न होतात, अरिष्ट, अडीअडचणी दूर करतात, अशी समस्त हिंदू समाजाची धारणा आहे. आपल्या पुराणात महादेवांबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या गेल्या आहेत. योग परंपरेत शिवाला देव म्हणून पुजले जात नाही तर आदिगुरू म्हणजेच ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावते, ते प्रथम गुरू म्हणून मानले जाते. हजारो वर्षे ध्यानधारणा केल्यानंतर एके दिवशी मन आणि शरीर स्थिर बनते. त्यांच्या सर्व हालचाली बंद होतात. त्यामुळे योगी, महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र म्हणून पाहिले जाते.
भगवान शंकराचे माता-पिता कोण हे अज्ञात असले तरी महादेव आणि पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला, अशी आख्यायिका आहे. याचबरोबर सर्व परिचित असलेली आख्यायिका म्हणजे समुद्रमंथन झाले त्यावेळी त्यामधून जे विष (हलाहल) बाहेर पडले की, ज्यामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती, ते विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचविले.
मात्र, विष प्राशन केल्यामुळे भगवान शंकराच्या देहाची लाहीलाही होऊ लागली, कंठ निळा झाला, अंगाची लाही लाही होते म्हणून महादेवांनी तांडव नृत्य केले. महादेवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा सल्ला वैद्यांनी दिला. ती रात्र भगवान शंकरांना बरे वाटावे म्हणून अन्य देवांनी नृत्य, गायन करून जागून काढली. यामुळे ब्रह्मांड वाचले. सकाळी भगवान शंकरांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला, तो दिवस महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते. भगवान शंकरांचे निवासस्थान म्हणून कैलास आणि स्मशान ओळखले जाते. भगवान शंकरांच्या हाती त्रिशूळ आहे. खंडोबा, जोतिबा यांना शंकराचे अवतार मानतात, तर मुख्य देवता म्हणून कालभैरव, हनुमान, दत्तात्रय यांना मानतात. अग्निपुराण, शिवपुराण, पद्धपुराण यामध्ये शिवरात्रीच्या महात्म्याचे वर्णन केले गेले आहे.
महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान वाहिले जाते, याविषयीदेखील एक आख्यायिका सांगितली जाते. एक शिकारी झाडावर शिकारीला बसला असताना, शिकार व्यवस्थित दिसावी म्हणून झाडाची पाने खाली टाकत असताना, ती पाने खाली असलेल्या पिंडीवर पडत होती, त्या शिकार्‍याला उपवास घडला आणि पुण्यदेखील मिळाले. शिवभक्त हे कपाळावर भस्म लावतात.
बारा ज्योतिर्लिंग ही भगवान शंकराची तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातात. त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, भीमाशंकर, वेरूळ आदी ठिकाणी महाशिवरात्रीला लाखो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. शिवलिलामृत, भजन, महारूद्र यांचे आयोजन केले जाते. शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो, 108 वेळा बेलाची पाने वाहून शिवनामावलीचा जप केला जातो. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, शहापूर येथील गंगा देवस्थान, त्याचबरोबर राज्यात सर्वत्र ठिकाणी महाशिवरात्रीची जत्रा भरते. ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर येथे तर महाशिवरात्रीला शिवभक्तांची मोठी गर्दी उसळते.

The night of the God of Gods, Mahadev – Mahashivratri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *