मौनात दडलेला हंबरडा..

कानपूरमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल मान महेंद्र यांच्या आत्महत्येनं संपूर्ण समाजाला एका गंभीर प्रश्नासमोर उभं केलं आहे. एक कर्तव्यदक्ष आणि शांत स्वभावाचा केवळ 30 वर्षीय कर्मचारी, जो आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत करत होता, त्याने अचानक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. ही घटना 2 डिसेंबर 2025 रोजी घडली. ही घटना केवळ एका व्यक्तीची ट्रॅजेडी नाही, तर ती कौटुंबिक वाद, मानसिक ताण आणि एकाकीपणाच्या गहन समस्येचीच प्रतिमा आहे. महेंद्रने सुसाईड नोटमध्ये लिहिलेली काही वाक्ये : दोन प्रेमाचे शब्द बोलली असतीस तर दुसरं लग्न कर, मुलांची जबाबदारी दादा-वहिनी घेतील. वाचताना त्याच्या मनातील वेदना आणि निराशा स्पष्ट दिसते- एक माणूस जो प्रेमाच्या दोन शब्दांसाठी तडफडत होता पण त्याला मिळाली ती फक्त तुटलेली नाती आणि असह्य ताण. तसेच, त्याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर अपलोड केलेला एक भावनिक व्हिडिओ, ज्यात तो म्हणतो, ”देखना, जब मैं मरूंगा ना, तो हंसते हुए मरूंगा. क्योंकि जीते जी मैं बहुत रोया हू.., हा त्याच्या एकटेपणाची खोली उघड करतो.
घटना घडली तेव्हा सुरुवातीला कारण स्पष्ट नव्हते. कुटुंबीयांनी कर्जाच्या ओझ्याचा उल्लेख केला, ज्यामुळे मानसिक तणाव वाढला असावा. पण नंतर चित्र बदलले. ज्यात कर्जाचा कुठेच उल्लेख नव्हता. उलट कौटुंबिक कलह, अप्रेमाची वेदना आणि एकाकीपणाच्या जखमांनी तो या स्तरापर्यंत गेला हे सध्यातरी लक्षात येते.
महेंद्रची पत्नी 26 नोव्हेंबरला मुलांसह मथुरेतील माहेरघरी गेली होती. त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून कुटुंबाशी संपर्क तुटला होता. 1-2 डिसेंबरच्या रात्री त्याच्या भावाने त्याला फोन केला, पण महेंद्रने ड्यूटीवर असल्याचे सांगून कॉल कट केला आणि काही तासांतच त्याच्या मृत्यूची धक्कादायक बातमी आली. ही घटना दाखवते की बाहेरून दिसणारी कारणे आणि खरी वेदना यात किती फरक असतो ते.
मान महेंद्रच्या आत्महत्येमागे लपलेल्या जखमा या जरी बाहेरून दिसत नसल्या, पण त्या खोलवर रुजलेल्या होत्या. समाजात असा समज आहे की पुरुष मजबूत असतात, ते सहज खचत नाहीत; पण सत्य हे आहे की मानसिक ताण कोणालाही तोडू शकतो. महेंद्रच्या बाबतीत सततचे वैवाहिक वाद, पत्नीचे असहकार्य, संवादाचा पूर्णपणे तुटलेला पूल, कामाचा दबाव आणि कुटुंबात वाढलेला एकाकीपणा हे सगळे एकत्र येऊन त्याच्या मनावर भार टाकत होते. खरंतर आत्महत्या ही कधीच अचानक घडणारी कृती नसते- ती अनेक दिवस, अनेक प्रसंग आणि असंख्य छोट्या-मोठ्या जखमांचा एकत्रित परिणाम असते. अशा वेळी एक छोटीशी सहानुभूती किंवा प्रेमाचे दोन शब्दही त्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकतात, पण दुर्दैवाने त्याला ते मिळाले नाहीत.
ही घटना समोर येताच समाजात विविध प्रतिक्रिया उमटल्या, ज्याने समाज दोन-तीन गटांत विभागला गेला. काही जण म्हणतात की, आजच्या काळात महिलांचे वाढते वर्चस्व आणि पुरुषांवर होणारा कौटुंबिक छळ हे वास्तव आहे. असंख्य पुरुष खोटे गुन्हे, अनावश्यक भांडणे आणि आर्थिक मागण्या सहन करत आहेत आणि या वेदनांकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दुसरीकडे, काहींचे मत आहे की, महेंद्रचा निर्णय चुकीचा होता. मुलांना अनाथ करून जाणे हे कधीच योग्य नाही. समस्या असतीलही, पण आयुष्य संपवणे हा उपाय नाही. कारण आई-वडील हे मुलांसाठी संपूर्ण जग असतात आणि त्यांचे अचानक जाणे मुलांचे बालपण आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त करू शकते. तिसरा गट असा आहे जो म्हणतो की, दोघांनीही वेळेत काउन्सिलिंग घ्यायला हवे होते. भारतीय कुटुंबांमध्ये काउन्सिलिंगला दुर्बलतेचे प्रतीक समजले जाते, पण खरेतर ती नात्यांना वाचवणारी आणि मानसिक आरोग्याला मजबूत करणारी प्रक्रिया आहे आणि शेवटचा मुद्दा हा की, घरच्या लोकांनी वेळेत पाठिंबा दिला असता तर ही घटना टाळताही आली असती. महेंद्रच्या वेदनेकडे दुर्लक्ष झाले, ज्याने परिस्थिती अधिक बिघडली.
या सगळ्यात सर्वांत मोठा आणि तरीही दुर्लक्षित मुद्दा आहे तो म्हणजे, मानसिक आरोग्य! आपल्या समाजात याबद्दल बोलणे अजूनही लाज, भीती आणि गैरसमजांच्या आड दडलेले आहे. पुरुष रडत नाहीत, सहन कर, लग्न असतंच तसं. घरचे वाद बाहेर का सांगायचे? किंवा काउन्सिलिंग म्हणजे परदेशी संस्कृती- हे सगळे गैरसमज पिढ्यान् पिढ्या वाढत गेले आणि परिणामी अशा घटना वाढू लागल्या.
मानसिक ताण हा दिसत नसतो, पण तो सर्वांत धोकादायक असतो. जखमा दिसल्या तर उपचार होतात, पण मनातील जखमा दडलेल्या राहून आयुष्य संपवण्यापर्यंत पोहोचतात.
महेंद्रच्या नोटमध्ये व्यक्त झालेली हळहळ म्हणजे- दोन प्रेमाचे शब्द बोलली असतीस तर हे दाखवते की, छोट्या छोट्या गोष्टी किती मोठा फरक करू शकतात.
मान महेंद्रची कथा ही केवळ एका व्यक्तीची वेदना नाही- ती या काळातील तुटलेल्या संवादाची, वाढलेल्या अहंकाराची, कमी झालेल्या समजुतीची आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षाची प्रतिमा आहे. ही घटना आपल्याला सांगते की, प्रेम, सहानुभूती आणि वेळेत मदत हे आयुष्य वाचवू शकतात. जर आपण हे शिकलो तर अशा ट्रॅजेडी टाळता येतील, आणि समाज अधिक संवेदनशील आणि मजबूत बनू शकेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *