पाच महिन्यांत तीन हुंडाबळी
वर्षभरात 72 महिलांचा सासरी जाच
नाशिक ः देवयानी सोनार
पुण्याची विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने राज्यभरात सध्या महिलांच्या आत्महत्येचा व सासरच्या मंडळींकडून होणार्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हुंड्यात फॉर्च्युनर, पन्नासहून अधिक तोळे सोने, सात किलो चांदी, महागडा मोबाइल, घड्याळ, असे सारे देऊनही वैष्णवीचा छळ न थांबल्याने तिने कंटाळून अखेर मृत्यूला कवटाळणे पसंत केले. ही समस्या एकट्या वैष्णवीचीच नसून, नाशिकमध्येदेखील गेल्या पाच महिन्यांत तीन विवाहितांनी सासरच्या छळाला कंटाळून इहलोकाची यात्रा संपवली. वर्षभरात 72 म्हणजे महिन्याला सहा विवाहितांना सासरच्या मंडळींकडून छळ झाल्याने पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागल्याचे चित्र शहरात आहे.
गंगापूर परिसरातील 37 वर्षीय भक्ती गुजराथी यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, भक्तीचा हा प्रेमविवाह होता. गेल्या 17 वर्षांपासून त्यांच्यात प्रेम होते. पण विवाहाच्या पाचच वर्षांत तिलाही मृत्यूला सामोरे जावे लागले. हे प्रकरण ताजे असतानाच काल-परवा मर्सिडीजसाठी माहेरहून पैसे आणले नाहीत म्हणून उच्चशिक्षित विवाहितेच्या छळाची घटना समोर आली.
महिलांवर होणार्या अत्याचाराच्या प्रकरणांत चिंताजनक वाढ झाल्याचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर कायद्यात बदल करण्यात आला आहे. पूर्वीचे 498 कलम आता बीएनएस कलम 85 नुसार विवाहित महिलेस कुरवाळणे, छळ करणे, मानसिक किंवा शारीरिक त्रास देणे या गुन्ह्यांंसाठी आरोपीस तीन वषार्ंपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. विवाहितेवर अत्याचार करणार्यांवर अधिक कठोर कारवाई करता येणार आहे. अनेक प्रकरणांत पीडित महिला पुढे येण्यास धजावत नाहीत.
लग्न झाल्यानंतर पती-पत्नी किंवा इतर कुटुंबीयांकडून संसारात वाद होण्यास सुरुवात होते. कधी मुलीच्या माहेरहून पैशासाठी मागणी, तर कधी संशय, मानसिक, शारीरिक त्रास देणे सुरू होते किंवा सध्या सोशल मीडिया घटस्फोेट, हुंडाबळी, मृत्यूपर्यंत कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. विवाहितेच्या माहेरची माणसेही सासरी हस्तक्षेप करत असल्यानेे मुलींचे संसार विस्कटत असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत.
कुटुंबात महिलेला काही त्रास होण्यास सुरुवात झाली तर ती पोलिस ठाण्यात जाण्यास फारशी उत्सुक नसते. परिणामी तक्रार दाखल केली जात नाही, परंतु राज्य शासनाकडून प्रत्येक पोलिस ठाण्यात भरोसा सेलची स्थापना केलेली आहे. महिलांना पोलिस ठाण्यात आणि न्यायालयात जायचे नाही अशा वेळी भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल करू शकतात.
सुखी संसाराची स्वप्न पाहणार्यांच्या नशिबी मृत्यूला कवटाळणे हाती येत असेल तर लग्नसंस्था धोक्यात येऊ शकते, असे उपवर मुली व पालकांकडून मत व्यक्त होताना दिसते. हुंडाबळीच्या घटनांबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी समाजात व प्रशासनात ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
वर्षे कलम दाखल गुन्हे
2023 498 – (बीएनएस कलम 85) – 151
2024 498 – (बीएनएस कलम) – 174
2025 498 – (बीएनएस कलम) – 72
एकूण – 397
कौटुंबिक वादास अनेक कारणे
महिलांनी कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार होत असल्यास भरोसा सेलची मदत घ्यावी.
तक्रार दाखल करण्यास पुढे यावे. तक्रार आल्यास चौकशी केली जाते.
दोघांचे समुपदेशन केले जाते. प्रकरण सुटण्यासारखे नसेल तर गुन्हा दाखल करण्यास सांगितले जाते.
– प्रशांत बच्छाव, उपायुक्त शहर, गुन्हे शाखा
महिला आयोगाकडे 13 हजार तक्रारी
राज्य महिला आयोगाकडे गेल्या वर्षभरात जवळपास 13 हजार 738
विविध प्रकरणांमध्ये हुंडाबळीची एकही तक्रार नोंदविण्यात आली नव्हती.
सर्वाधिक तक्रारी वैवाहिक समस्यांच्या आहेत. हुंडाबळीच्या तक्रारींची
नोंद करण्यास महिलांची उदासीनता दिसून येते.
तीन वर्षांत 397 तक्रारी
नाशिकमध्येही हुंडाबळीच्या गेल्या पाच महिन्यांत तीन
तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
2024 मध्ये सहा तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या.
पोलिस ठाण्यात महिला अत्याचारासंबंधी गेल्या
तीन वर्षांत 397 तक्रारी दाखल झाल्याची धक्कादायक
माहिती समोर आली आहे.
छळाचे प्रकार
सतत टोमणे मारणे
रंगावरून हिणवणे
स्वयंपाकाविषयी कुरकुर
गाडी, जमीन
घेण्यासाठी पैसे मागणे
संशयाचे भूत
अनैतिक संबंध
सोशल
मीडियावरून भांडणे
सासू-सुनेचे न पटणे
नणंदेचा हस्तक्षेप