गरिबांचा कैवारी

गरिबांचा कैवारी
प्रेषित येशू ख्रिस्ताला सुळावर दिल्याचा शुक्रवार हा दिवस एक दु:खद दिवस मानला जातो. या दिवसाला गूड फ्रायडे म्हणतात. सुळावर दिल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे रविवारी येशू ख्रिस्त मृतावस्थेतून पुन्हा जिवंत झाले. या दिवसाला ईस्टर सण्डे म्हणतात. हा दिवस पवित्र, आनंदाचा, उत्साहाचा मानला जातो. आजारी असतानाही याच दिवशी रोमन कॅथॉलिक चर्चचे पोप फ्रान्सिस यांनी सार्वजनिक दर्शन दिले. सेंट पीटर चौकात जमलेल्या जवळपास ३५ हजार लोकांच्या गर्दीचे त्यांनी अभिवादन स्वीकारले. यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. आपले आयुष्य ईश्वराच्या सेवेसाठी, रोम येथील चर्चसाठी, गरिबांसाठी, शांततेसाठी समर्पित करणारे पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल जगभरात शोक व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती. नंतर हळूहळू सुधारली होती. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. प्रकृती बरी नसल्याने ईस्टर सण्डेला लोकांना दर्शन देतील आणि संवाद साधतील, अशी काही अपेक्षा नव्हती. प्रकृती अस्वस्थ असल्याने पोप फ्रान्सिस यांनी ईस्ट मासमध्ये सहभाग घेतला नाही. पण त्यांनी लहान मुलांना आशीर्वाद दिले. पोप या नात्याने धर्माचा संदेश देण्याचे कर्तव्य म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, असा उच्चार करत त्यांनी तुम्हाला ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या छोटेखानी भाषणात सगळ्या जगाचे हित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना युक्रेन, गाझा, कांगो, म्यानमार यांसह जिथे जिथे संघर्ष सुरु आहे तिथे शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना केली. ज्या ज्या ठिकाणी युद्ध सुरु आहे त्यांनी त्या युद्धांना विराम द्यावा, बंधकांना सोडावे आणि शांततेच्या भविष्याकडे वाटचाल करावी, उपासमारीने झगडणाऱ्या लोकांना मदत करावी, समाजातील उपेक्षित घटकांचे कल्याण करावे, त्यांच्याबाबत सहानुभूती बाळगावी. आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरं आहोत यावर विश्वास ठेवा आणि देवावरचा आपला विश्वास दृढ करा. असा आशय असलेला संदेश त्यांनी जमलेल्या लोकांसमोर दिला. जगाची, गरिबांची चिंता त्यांना असल्याचे याच भाषणातून दिसून येते. त्यांनी सुरुवातीपासूनच याच विषयावर भर दिला असल्याचे दिसून येते. रोमन कॅथोलिक चर्चचे ते पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू होते. त्यांचा जन्म अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स येथे १९३६ साली झाला. कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ हे त्यांचे मूळ नाव होते. वडील एक इटालियन स्थलांतरित रेल्वे कामगार होते, तर आई गृहिणी होती. तरुण असतानाच त्याच्या फुफ्फुसाला बाधा झाली. त्यावेळी त्यांचे एक फुफ्फुस काढण्यात आले. त्यांनी अनेक लहानसहान हलकी कामे केली. रसायनशास्त्र या विषयाचा अभ्यासही त्यांनी केला. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांचा धर्मोपदेशक म्हणून त्यांचा बाप्तिस्मा झाल्यानंतर ब्युनोस आयर्समधील गलिच्छ वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी गरिबांची सेवा केली, त्यांची काळजी घेतली. एक धर्मोपदेशक म्हणून हेच कार्य त्यांच्या जीवनाचे एक वैशिष्ट्य ठरले. शेवटपर्यंत त्यांनी गरिबांची सेवा करण्यावर भर दिला. हाच संदर्भ फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅंक्रो यांनी शोक व्यक्त करताना दिला. ब्युनोस आयर्सपासून रोमपर्यंत, चर्चने गरिबांसाठी आनंद आणि आशा, अपेक्षा घेऊन यावे, अशी पोप फ्रान्सिस यांची इच्छा होती. मानवजातीमध्ये आणि निसर्गाशी एकता निर्माण करावी. ही आशा त्यांच्या पलीकडेही सतत पुनरुज्जीवित होत राहो, असे म्हणत मॅंक्रो यांनी शोक व्यक्त केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हाच संदर्भ देत शोक व्यक्त केला. पोप फ्रान्सिस हे जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी करुणा, विनम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतिक म्हणून सदैव स्मरणात राहतील. लहानपणापासूनच ते प्रभू येशू ख्रिस्तांच्या आदर्शांचा पाठपुरावा करत जीवन जगले. त्यांनी गरिबांच्या, उपेक्षितांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले, असे मोदी यांनी म्हटले. पोप फ्रान्सिस एक परिवर्तनवादी होते. धर्मगुरू असूनही त्यांनी परंपरेला छेद देत चर्चच्या व्यवस्थापनात बदल घडवून आणले. कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची २०१३ मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली. त्यांनी फ्रान्सिस हे नाव स्वतःहून घेतले. युरोपबाहेरील पहिले पोप म्हणून त्यांची निवड झाली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. चर्च हे गरिबांचे व्हावे, असे त्यांना वाटत होते. जे उपेक्षित आहेत, त्यांचा चर्चमध्ये समावेश व्हावा, ही त्यांची धारणा होती. पोप झाल्यानंतर अलिशान पपल (पोप यांचे राहण्याचे ठिकाण) अपार्टमेंट्समध्ये राहण्याऐवजी त्यांनी सांता मार्ता येथील एका लहानशा हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी अभ्यागत धर्मोपदेशकांचा नेहमीच राबता असतो. आपली बॅग आपणच घेऊन ते रोमच्या रस्त्यांवरुन चालत गेले आणि स्वत:चा चष्मा स्वतःच विकत घेतला. जगातील लोकप्रिय आम नेत्यांपैकी एक नेते ते बनले. ते जगातील मूक लोकांसाठी ते सतत बोलत राहिले. बेघर लोकांसमवेत त्यांनी जेवण केले. कैद्यांचे पाय धुतले. युध्द किंवा आर्थिक अस्थिरतेने पळून आलेल्या स्थलांतरितांसाठी इटलीत त्यांनी घरांची सोय केली. चंगळवाद आणि व्यक्तीवादाला विरोध केला. अनुचित आर्थिक संरचना ही मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी पावले उचलावीत म्हणून सार्वजनिक वितरणासाठी त्यांनी जगभरातील कॅथॉलिक नेत्यांना एक औपचारिक पत्रही लिहिले होते. चर्चच्या केंद्रीय प्रशासनात त्यांनी सुधारणा घडवून आणली. चर्चचे अधिकारी आणि बिशप यांच्यासाठी राखीव असलेल्या व्हॅटिकनच्या कार्यालयांत आणि ठिकाणांवर महिला व पुरुषांना वावर करण्यास त्यांनी परवानगी दिली. जगभरात कोरोनाची लाट आली असतानाही त्यांनी सार्वजनिक प्रार्थनांमध्ये खंड पडू दिला नाही. अर्थात, लोकांना जमण्यास बंदी होती. रिकाम्या सेंट पीटर्स चौकात ‘द पिपल्स पोप’ संदेश द्यायला जायचे. कोरोना लस घेतल्यानंतर त्यांनी आपला वेळ वाया घालविला नाही. मोठी सुरक्षा जोखीम पत्करून ते इराकला गेले. इराकमधील मोसूल शहरात एकदा इसिसच्या दहशतवाद्यांनी चर्चेसची लुटमार केली होती. त्यांच्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी प्रार्थना केली. इराकला भेट देणारे ते पहिले पोप ठरले. मूल्य, धैर्य, करुणा आणि प्रेम शिकवणारे पोप फ्रान्सिस काळाच्या पडद्याआड गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *