कर्णकर्कश हॉर्न , वाहतुकीची कोंडी
रविवार कारंजा ते रेडक्रॉस मार्गावर वाहन चालवणे अवघड
नाशिक : प्रतिनिधी
शहरात स्मार्ट सिटीच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांमुळे एकीकडे पायी चालणे अवघड झाले असतानाच , रविवार कारंजा ते रेडक्रॉस या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे . सध्या या भागात विद्युत लाइनचे काम सुरू आहे . रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू असतानाच या मार्गावर रस्त्याच्या कडेलाच कार आणि इतर वाहने पार्क केलेली असतात . त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे . काल दुपारी तीनच्या सुमारास मोठी कोंडी झाली होती . त्यातच मार्ग काढण्यासाठी वाहनधारक कर्णकर्कश हाॅर्न वाजवतात . त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत . रविवार कारंजा ते रेडक्रॉस या मार्गावर सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत काम सुरू आहे . रस्त्याच्या कडेला खोदकाम केले जात आहे . त्यातच हा एकेरी मार्ग आहे . परंतु , रस्त्याच्या कडेला अनेकजण आपल्या कार तसेच टेम्पो , रिक्षा आणि मोटारसायकली पार्किंग केल्या जात असल्याने रस्ता अरुंद झाला आहे . त्यातच हा एकेरी मार्ग असतानाही विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनधारकांमुळे या वाहतूक कोंडीत भरच पडत आहे . काल कारंजा ते रेडक्रॉसपर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती .
अडकलेले वाहनधारक जोरजोरात कर्णकर्कश हॉर्न वाजवित होते . त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत होती . त्यातच शहरात वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून टोईंग कारवाई केली जात असली तरी या भागात मात्र टोईंग कारवाई होत नसल्याने वाहनधारक भररस्त्यातच वाहने पार्किंग करतात . त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहनधारकांना या रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे . शहरात टोईंगची कारवाई केली जात असली तरी महात्मा गांधी रोड , ठक्कर बसस्थानक , सिटी सेंटर मॉल , शरणपूर रोड , कॉलेजरोड या भागापुरतीच ती कारंजा भागात रस्त्याच्या कडेलाच अनेक विक्रेते ठाण मांडून बसतात .
कोंडीत ‘ वन – वे’चे उल्लंघन
रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी असतानाही शालिमार मेनरोडवरून येणारे नागरिक रविवार कारंजाला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करत असतात . त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते . अनेक वेळा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस रविवार कारंजाला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करत असल्याचे आढळल्यास कारवाई करतात .