22 किलो चांदी तफावतसह 16 गंभीर आरोपांवर त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित
नाशिक : प्रतिनिधी
सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, कर्मचारी शोषण, महिला कर्मचार्यांवरील अन्याय व प्रशासकीय मनमानीविरोधात ग्रामपंचायत सदस्या बेबीबाई गोविंद जाधव व सामाजिक कार्यकर्ते छगन गोविंद जाधव यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून, या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
चौथ्या दिवशी विश्वस्त मंडळाने गंभीर दखल घेत ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांचे तात्काळ निलंबन केले असून, उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या मुद्दा क्रमांक 1 ते 16 बाबत स्वतंत्र त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने 30 दिवसांच्या आत सखोल व
निःपक्षपाती चौकशी करून अहवाल सादर करावा, असे लेखी आश्वासन विश्वस्त मंडळाने दिले आहे. ट्रस्टमध्ये कार्यरत आदिवासी व महिला कर्मचार्यांचे शोषण, सातवा वेतन आयोग लागू न करणे, थकीत वेतन न देणे, बेकायदेशीर नियुक्त्या, पदनिश्चिती न करणे, मानसिक छळ, धमकी, महिला कर्मचार्यांवरील लैंगिक छळाचे आरोप तसेच आई भगवतीच्या गाभारा
जीर्णोद्धारात 22 किलो चांदीची तफावत असल्यासारखे अत्यंत गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केले होते. या मागण्यांना सीटूप्रणीत कामगार संघटना, ट्रस्टमधील कर्मचारी, महिला कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला. शनिवारपासून आंदोलनस्थळी बिर्हाड आंदोलन सुरू करण्यात आले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनावर दबाव वाढला. या आंदोलनाची दखल मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जग्गनसिंग कुलस्ते यांनी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. नाशिक येथील भ्रष्टाचारविरोधी लढ्यातील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान तसेच ज्येष्ठ विधिज्ञ सुरेंद्र सोनवणे यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
विश्वस्त मंडळाने सर्व निर्णय लेखी स्वरूपात जाहीर केल्यानंतर आणि चौकशी समितीचा अहवाल निश्चित कालावधीत सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, “चौकशी अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र केले जाईल,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
विश्वस्त मंडळाचे ठळक निर्णय
♦ 22 किलो चांदी तफावत प्रकरणी स्वतंत्र लेखापरीक्षण व फौजदारी चौकशी
♦ मुद्दा क्र. 1 ते 16 बाबत त्रिसदस्यीय चौकशी समिती
♦ चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे निलंबित
♦ निलंबन काळात सहा. व्यवस्थापक भगवान भिमराव नेरकर यांच्याकडे पदभार
♦ सातवा वेतन आयोग, थकीत वेतन, पदनिश्चिती, कन्फर्मेशन ऑर्डरबाबत नियमांनुसार निर्णय
♦ महिला कर्मचार्यांवरील गंभीर आरोपांबाबत व अंतर्गत कारवाईचा मार्ग खुला
♦ त्रिसदस्यीय समितीत उपोषणकर्ते छगन जाधव सुचवतील त्या दोन सदस्यांचा समावेश.