नगरपरिषद निवडणूक; सिन्नरला भाजपा आणि शिंदे गटानेही शड्डू ठोकला

विठ्ठल उगले

प्रमोद चोथवे

हेमंत वाजे

नामदेव लोंढे
सिन्नर : भरत घोटेकर
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे, नाशिक जिल्ह्याचे शिवसेना उबाठा गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे दोन्ही प्रबळ गट सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच भाजपाचे युवा नेते उदय सांगळे आणि शिवसेना शिंदे गटाने नगरपरिषद निवडणुकीत उडी घेत या दोन्ही प्रबळ नेत्यांपुढे आव्हान निर्माण केल्याने ही लढत आता चौरंगी बनली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत सत्तेची सूत्रे आपल्या ताब्यात घेण्यासाठी चारही गटांत चढाओढ सुरू असून, नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
माणिकराव कोकाटे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आहेत. नाशिकसह इतर पाच जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर सोपवली आहे. अशा जबाबदार पदावर असताना होम ग्राउंडवर सिन्नर नगरपरिषदेची सत्ता हातात असणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या निवडणुकीत कोकाटे माजी आमदार होते. तर राजाभाऊ वाजे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनी कोकाटे यांच्या हातून सिन्नर नगरपरिषदेची सत्ता हिसकावून घेतली होती. त्याचा वचपा या निवडणुकीत काढण्यासाठी कोकाटे पुरेपूर प्रयत्न करतील, अशी चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठल उगले यांचा शहरात दांडगा संपर्क आहे. शिवाय, त्यांची कामाची पद्धतही सर्वश्रुत आहे. कोकाटे गटासाठी ही जमेची बाजू आहे. नगरपरिषदेची सत्ता ताब्यात घेऊन अजित पवारांपुढे आपले वर्चस्व सिद्ध करणे कोकाटे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. सत्ता हातातून गेली तर जिल्ह्यात आणि राज्यात वेगळा मेसेज जाईल. पुढच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याचा फटका बसेल, याची जाण असल्याने कोकाटे आणि त्यांची कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे सत्ता मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची शक्यता आहे.
खासदार वाजे यांना सोडचिठ्ठी देऊन उदय सांगळे यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. विधानसभेत खासदार वाजे यांच्यामुळे आपला पराभव झाल्याचा ठपका त्यांनी नुकत्याच केलेल्या भाजप पक्षप्रवेशावेळी ठेवल्याने उभय नेत्यांमध्ये आता वाक्युद्ध सुरू झाले आहे. भाजपात प्रवेश करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी आपले सामर्थ्य दाखवून दिले. वाजे यांच्या छत्रछायेखाली काम केलेल्या सांगळे यांना नगरपरिषद निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची आलेली संधी ते दवडणार नाहीत. भाजपात आपले प्रस्थ वाढवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे यांची उमेदवारी त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. खासदार वाजे घराण्याचा पाठिंबा नसतानाही वाजे घराण्यातील उमेदवार आपण निवडून आणू शकतो, असा संदेश देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. नगरसेवकपदाच्या 5 जागांवर उमेदवार नसले तरी इतर ठिकाणी मात्र त्यांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित
केले आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरच शिंदे गटाची मदार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्यामुळे त्यांनी सिन्नर नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून घेतला. सिन्नरमध्ये प्रबळ नेतृत्व नसले तरी जिल्हास्तरीय नेते हेमंत गोडसे, विजय करंजकर यांच्या माध्यमातून तालुकाप्रमुख योगेश म्हस्के, उपजिल्हाप्रमुख दत्ता डोमाडे, दीपक खुळे यांना त्यांनी बळ दिले आहे. शिवाय, नामदेव लोंढे यांच्यासारखा तगडा उमेदवार गळाला लावून मंत्री कोकाटे यांना धक्का दिला. थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी लोंढे यांना देत त्यांनी सिन्नर नगरपालिकेत जुगार खेळला आहे. योग्य पत्ता पडला तर डाव यशस्वी होईल, अशी रणनीती यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर मदत होणार असल्याची चर्चा आहे. नगरसेवकपदाच्या 30 पैकी केवळ 14 जागांवर उमेदवार देण्यात शिंदे गटाला यश आले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे धडाकेबाज बॅट्समन लोंढे यांच्यावरच शिंदे गटाची संपूर्ण मदार आहे.
खासदार वाजे यांच्या अस्तित्वाची लढाई
गेल्या निवडणुकीत खासदार राजाभाऊ वाजे यांनी उदय सांगळे सोबत असताना नगराध्यक्षपदाबरोबरच 28 पैकी 17 जागांवर विजय मिळवत कोकाटे यांच्याकडून सत्ता खेचली होती. आता सांगळे सोबत नसले तरी शहरात वाजे यांची ताकद बर्यापैकी आहे. त्यामुळे अस्तित्व कायम असल्याचे दाखवून देण्यासाठी त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आपले जिवलग मित्र प्रमोद चोथवे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत त्यांच्या विजयासाठी वाजे मैदानात उतरले आहेत. त्यांना विजयी करून यानिमित्ताने जातीवादाचा कलंक पुसण्याची आलेली संधी ते सोडणार नाहीत. विशेष म्हणजे, त्यांचे चुलते हेमंत वाजे यांनी प्रतिस्पर्धी उदय सांगळेंशी संधान साधत भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी केल्याने वाजे पिता-पुत्रांना त्याची ठेच पोहोचली आहे. त्यामुळे सांगळे यांचे प्लॅन हाणून पाडण्यासाठी 85 वर्षांचा योद्धा ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे मैदानात उतरले आहेत. नगराध्यक्षपदासह नगरपालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी खासदार वाजे यांनी कंबर कसली आहे. सिन्नरबरोबरच मतदार नाशिक लोकसभा मतदारसंघातील इतर नगरपरिषदांची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.