नाशिक

पांढुर्ली ते भगूर रस्त्याची झाली चाळण

जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे प्रशासन

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली ते भगूर हा रस्ता, जो इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक या तीन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडतो, त्याची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. हा केवळ एक रस्ता नाही, तर शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचा दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेला महत्त्वाचा मार्ग आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची झालेली दुर्दशा आणि प्रशासनाची उदासीनता ही विकासाच्या गळ्याशी आलेली गाठ ठरते.
लाजिरवाणी बाब म्हणजे हा सिन्नर तालुका राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मतदारसंघ आणि खासदार राजाभाऊ वाजे यांचा तालुका असूनही या भागात विकासाचे दर्शनही नाही. धरण उशाशी, कोरड घशाशी अशी स्थिती जनतेची झाली आहे. सर्वसामान्य माणसाला दुर्दैवाने त्रास सहन करण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही.
काही महिन्यांपूर्वी पांढुर्ली फाट्यावर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाळदे (पहिलवान) यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन झाले. यानंतरही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षच केले.
कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत गरजा आहेत. यातील एकाही गोष्टीचा अभाव असेल, तर विकासाची चर्चा म्हणजे केवळ गाजर दाखवणे. आज केंद्र सरकार विकसित भारत आणि मेड इन इंडियासारख्या संकल्पनांवर भर देत असताना, ग्रामस्तरावर रस्त्याची अशी वाईट अवस्था असेल, तर या घोषणांची व्यावहारिकता तपासण्याची वेळ आली आहे.
आज मत मागायला प्रत्येकाच्या घरी हात जोडणारे आमदार, खासदार आणि नेते प्रतिनिधित्व करत असले तरी, समस्या सुटण्यासाठी त्यांची उपस्थिती कुठेच जाणवत नाही. लोकशाहीत मतदार हे सर्वोच्च असतात, त्यांची समस्या ऐकणे आणि सोडवणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे.

पांढुर्ली ते भगूर रस्त्याची अवस्था ही केवळ एका रस्त्याची नव्हे, तर शासनाच्या दुर्लक्षाची, जनतेच्या सहनशीलतेची आणि प्रशासनाच्या असंवेदनशीलतेची साक्ष आहे. आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित डागडुजी व पुनर्बांधणी करावी, हाच नागरिकांचा ठाम आणि न्याय आग्रह आहे. अन्यथा, हे रोष केवळ आंदोलनांपुरते मर्यादित राहणार नाही, तर निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही.
– भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक

 

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

11 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

11 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago