शाळेचे आवार चिमुकल्यांनी पुन्हा फुलले…

नवीन शैक्षणिक वर्ष; पावसाच्या झेलत सरी, आली विद्यार्थ्यांची स्वारी

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना रोपे, भेटवस्तू, पाठ्यपुस्तके, गणवेश देत, तसेच औक्षण करत स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षामुळे शाळेचे आवार गजबजून गेले. वर्गांना फुग्यांनी सजविण्यात आले होते. तसेच शाळेच्या आवारात आकर्षक रांगोळ्या काढून परिसर सुशोभित करण्यात
आला होता.
शाळेच्या पहिल्या दिवशी पावसानेही हजेरी लावत जणू विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी प्रत्येक शाळेने मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आमंत्रित केले होते. मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह विविध शालेय पदाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. लहान मुले गणवेश आणि दप्तर घेत शाळेचा पहिला दिवस अनुभवण्यासाठी दाखल झाले होते. पालकांनाही मुलांना सोडून जाताना गहिवरून आले होते. याप्रसंगी शिक्षकांनी मुलांना आवडीच्या वस्तू देत
स्वागत केले.
समग्र शिक्षाअंतर्गत मोफत गणवेश योजनेतून जिल्ह्यातील दोन लाख 53 हजार 678 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश, सॉक्स व बूट देण्याचे नियोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली.
जिल्ह्यातील चार हजार 238 लाभार्थी शाळा असून, लाभार्थी विद्यार्थिसंख्या चार लाख 88 हजार 321 आहे. या विद्यार्थ्यांसाठी 28 लाख 57 हजार 633 पाठ्यपुस्तकांच्या प्रती शाळा स्तरावर पोहोचविण्यात आल्या आहेत. 15 तालुक्यांत माध्यम व इयत्तानिहाय लाभार्थी संख्येनुसार पाठ्यपुस्तक संच पोहोचविण्यात आल्याचे बच्छाव यांनी सांगितले.पुस्तकांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, विद्यार्थी गळती रोखणे आणि शंभर टक्के उपस्थिती राहावी यासाठी राज्य शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. अनेक ठिकाणी गावातून फेरी काढण्यात आली.
ध्वनिक्षेपकावर शाळेत पाठविण्यासंबंधी आवाहन करण्यात आले. सुटीनंतर बालकांना शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून पहिल्याच दिवशी गणवेश, पुस्तके माध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्याच्या सूचना होत्या. मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांना प्रवेशोत्सवाला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके देत स्वागत करण्यात आले.

पावसाच्या सरी झेलत विद्यार्थी शाळेत

सकाळी ऐन शाळा भरण्याच्या वेळेतच शहर परिसरात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अंगावर पावसाच्या सरी झेलतच अनेक विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचले. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही शाळेत पोहोचताना पावसामुळे तारेवरील कसरत करावी लागली.

नवीन एनईपीची पहिली इयत्ता

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) तयार केलेल्या पाठ्यक्रमासह इयत्ता पहिलीचे विद्यार्थी (दि.16) शाळेची पायरी चढले. प्रत्येक इयत्तेत पुढे जाताना ते नवीन बदललेल्या अभ्यासक्रमांचे पहिले विद्यार्थी असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *