पोळा सणावर ओल्या दुष्काळाचे सावट; बळीराजा संकटात

बैल घटले, सर्जा-राजाच्या सजावटीच्या साहित्याला मागणी कमी; दुकानदार चिंतेत

नाशिक : अभय पांडे
बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. भारतीय संस्कृतीत इतर सणांप्रमाणे बैलपोळ्यालादेखील महत्त्व असल्यामुळे सर्जा-राजाचा सण पोळा आला आहे. बैलांची सजावट करण्यासाठी लागणार्‍या वस्तूंची नाशिकची बाजारपेठ सजली आहे; मात्र यंदा नाशिकसह सर्वत्र मुसळधार पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी ओल्या दुष्काळाच्या संकटात आहे. त्यामुळे पोळा सणावर काहीसे सावट दिसून येते. साहजिकच बाजारपेठेत सर्जा-राजाला सजवण्यासाठी लागणार्‍या साहित्याच्या खरेदीसाठी फारसा उत्साह दिसून येत नाही, मात्र तरी काही ग्राहक हौसेने काही वस्तू घेताना दिसून येत आहेत.

नाशिकलगत असणार्‍या मखमलाबाद, दरी, मातोरी, नाशिकरोड नजीकचे दसक-पंचक, शिंदे-पळसे, देवळाली परिसरातील गावे, मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी परिसरातील गावे, अंबड-सातपूर परिसरासह पंचवटीतील काही भागात शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच अद्याप काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने शेती केली जाते. मात्र, या भागातील आता बैलांची संख्या कमी झालेली दिसून येते. शहरातील बाजारपेठेतही बैलांच्या सजावटीसाठी वस्तूंची रेल दिसून आली. घरोघरी बैलांच्या प्रतिमांचे पूजन होते. यामुळे बाजारात मोठ्या संख्येने मातीचे बैल दाखल झाले आहेत. याशिवाय, कलाकुसर आणि रंगरंगोटी केलेल्या आकर्षक बैलजोड्याही उपलब्ध आहेत. प्रतिनग दहा रुपयांपासून, तर मोठ्या बैलजोड्या हजार रुपयांपर्यंतही उपलब्ध आहेत.
नाशिकसह जिल्ह्यात यावर्षी बैलपोळ्याचा उत्साह मंदावल्याचे चित्र दिसून आले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेत ग्राहकांची संख्या कमी झाली असून, दुकानदारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पूर्वी बैलपोळ्याच्या आधीच बाजारपेठ गजबजून जायची. हार-फुले, गोंडे, झूल, नवा दोरखंड, फेटे, तेल-उटणे, तसेच बैलांसाठी खास गोडधोड विकत घेण्यासाठी गर्दी व्हायची. पण यंदा त्या वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे दुकानदार सांगतात. “मागच्या वर्षी मी तीन दिवसांत इतका माल विकला होता, पण यंदा तो माल हातात पडून राहिला आहे,” असे एका सजावटीच्या सामानाच्या दुकानदाराने सांगितले. दुसरे एक मिठाई विक्रेते म्हणाले, बैलांची संख्या कमी झाली, लोक खरेदी करायलाच येत नाहीत. विक्री निम्म्याने घटली आहे. मात्र, यावर्षी दुकानदारांच्या म्हणण्यानुसार ग्राहकांची संख्या जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. “बैलांची संख्या घटल्याने ग्राहकही कमी झाले. त्यामुळे विक्रीत मोठी घट झाली आहे,” अशी खंत दुकानदारांनी व्यक्त केली. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मान्य केले आता की, परिस्थिती बदलली आहे. एका शेतकर्‍याने सांगितले, “पूर्वी प्रत्येक घरात बैल असायचे. त्यांना सजवून मिरवणे हा आनंदाचा क्षण असायचा. आता गावात मोजक्याच घरांत बैल आहेत, त्यामुळे सणाचा तोच थाट उरलेला नाही.” तर काही नागरिकांच्या मते, परंपरा टिकवण्यासाठी तरी हा सण साजरा करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत शेतीसाठी ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्रीचा वापर वाढल्याने बैलांचे महत्त्व कमी झाले आहे. त्याचबरोबर चार्‍याचा तुटवडा, पशुपालनाचा खर्च आणि देखभालीची अडचण यामुळे शेतकरी बैल पाळण्यास कमी उत्सुक आहेत. परिणामी, गावोगाव बैलांची संख्या घटली असून, थेट परिणाम बैलपोळ्याच्या परंपरेवर झाला आहे.

बैलांप्रति कृतज्ञतेचा सण
बैलपोळा हा शेतकर्‍यांचा आपल्या बैलांप्रति असलेला कृतज्ञतेचा सण आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीत सजलेले बैल, रंगीबेरंगी हार-
फुले, गोडधोड यामुळे वातावरण उत्साहवर्धक होत असे. परंतु, आता अशी दृश्ये हळूहळू विरळ होत असून, बैलपोळ्याचा पारंपरिक उत्साह कमी होत चालल्याचे नागरिक सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *