सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
आषाढवारीसाठी निघालेली श्री संत निवृत्तिनाथांची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर जाऊन पोहोचली आहे. येथे सर्व संतांची भेट होत आहे. गतवर्षी आषाढी एकादशी एका वर्षाने संतांची येथे गळाभेट होत असल्याने वारकरी भक्तांचे हृदय उचंबळून आले आहे. संत नामदेव महाराज दिंडी सर्व संतांच्या पालखी पंढरपुरात घेऊन जाण्यासाठी येईल व सर्वांचा नगर प्रवेश होईल. सायंकाळपर्यंत सर्व मुक्कामाच्या ठिकाणावर पोहोचतील.
शुक्रवारी भीमा-नीरा नदीच्या तीरावर चिंचोली येथे मुक्काम झाला. सायंकाळी 6च्या सुमारास पालखी पोहोचल्यावर भीमा नदीचे स्नान झाले. आरती झाली. भजन, कीर्तनात वारकरी दंग झाले. जवळपास महिन्याभरापासून पायी निघालेले वारकरी पांडुरंगाच्या भेटीला, चंद्रभागेच्या स्नानाला आतुर झाले आहेत.
शनिवारी दुपारच्या आत वाखारी येथे पालखी सोहळा रथ दाखल होईल. वाखारी येथे रिंगण सोहळा होत असतो. येथे दिंड्यांचे स्वागत होते. संत नामदेव महाराज दिंडी येथे संतांच्या भेटीला येत असते. पंढरपूर देवस्थान संस्थानचा रथ पांडुरंगाला घेऊन येथे येतो.शेकडो किलोमीटर अंतरावरून त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथ महाराज पालखी, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, सासवडचे संत सोपनदेव महाराज, मुक्ताईनगर येथील मुक्ताई पालखी सोहळा, पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखी, देहूची संत तुकाराम महाराज पालखी या सर्व संतांची भेट रथातून आलेल्या पांडुरंगाच्या साक्षीने होते. संत नामदेव महाराज या सर्व संतांचा मेळा पंढरपुरात घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. आज दशमीला नगर प्रवेश होईल.

यंदा लाखापेक्षा अधिक वारकरी सहभागी
यंदा 10 जूनला त्र्यंबकेश्वर येथून पालखी प्रस्थान झाले. काही तिथींचा क्षय असल्याने यावेळेस पालखी 26 व्या मुक्कामाला पंढरपूर येथे पोहोचली आहे. संत निवृत्तिनाथ मठ येथे पालखीचा मुक्काम असेल. वारकरी सोयीनुसार पूर्वापार ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करतील. एकादशीला सकाळी नगर प्रदक्षिणा होईल. नाथांच्या पादुका गुरुपौर्णिमेस श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी घेऊन जात असतात. त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास होत असतो. यंदा संत निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यात जवळपास 60 लहान-मोठ्या दिंड्यांच्या माध्यमातून लाखापेक्षा अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *