अमरावती : महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती अतिशय गंभीर असून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व कुटुंबांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा पुरवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. खासदार राणा यांनी यापूर्वीदेखील अनेकदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी केली आहे.
नवनीत राणा यांनी एक चित्रफीत प्रसारित करून, बंडखोर शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांना पाहून घेण्याची धमकी दिल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी सर्वसामान्य व्यक्तींना धमकावण्याचा प्रकार योग्य नाही, त्यांच्या या वक्तव्याची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गुंडांकडून शिवसेनेशी बंडखोरी करणार्या खर्या शिवसैनिकांच्या घरावर, कार्यालयावर हल्ले करण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून यावर त्वरित आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष द्यावे, असेदेखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
ज्या दिवशी कॉंग्रेससोबत जाण्याची वेळ येईल त्याचक्षणी शिवसेनेचे दुकान बंद करणार, असे वक्तव्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वारंवार भाषणांमधून करायचे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द आठवावेत, असा टोलादेखील नवनीत राणा यांनी लगावला आहे.