सुवर्णपदक प्राप्त प्रियेशा देशमुखच्या कामगिरीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

राज्य सरकारकडून साधा सत्कारही नाही

नाशिक :  प्रतिनिधी
नियमित ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणेच विशेष तथा दिव्यांग खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिंपिक स्पर्धा घेण्यात येतात, या स्पर्धेत मूळची नाशिकची कर्णबधीर दिसले डिस्लेक्सियाग्रस्त खेळाडू कु. प्रियेशा शरद देशमुख हिने नेमबाजी स्पर्धेत आपल्या देशाला म्हणजेच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. परंतु राज्य शासनाने तिच्या या सुवर्ण कामगिरीची साधी दखल सुद्धा घेतली नाही. त्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने असो की, विद्यमान शिंदे – फडणवीस यांचे शिवसेना – भाजप युतीचे सरकार या दोन्ही सरकारांनी तिच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण कामगिरी बद्दल कोणतीही बक्षीस दिले नाही इतकेच नव्हे तिचा साधा सत्कार सुद्धा केला नाही. दक्षिण आफ्रिकेत ब्राझील देशात यावर्षी सुमारे चार महिन्यापूर्वी मे मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर डेफ ऑलिंपिक स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सहभागी होत चमकदार कामगिरी केली होती.विशेष म्हणजे या स्पर्धेत मुळची नाशिकची रहिवासी कु. प्रियेशा शरद देशमुख हिने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये
मिश्र दुहेरी स्पर्धेत रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या या कामगिरीची दखल घेत तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला नवी दिल्ली येथे खास निमंत्रित करून संवाद साधत कौतुक केले होते. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारकडून देखील तिच्या या सुवर्ण कामगिरीचे कौतुक व्हावे म्हणून राज्याच्या शिक्षण, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाशी संपर्क साधला होता. तत्कालीन क्रीडामंत्री यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली होती, परंतु राज्य शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही, दरम्यानच्या काळात या स्पर्धेला चार महिने उलटले. आता राज्यात सत्तांतर झाले, या संदर्भात पुन्हा मुंबईत पत्रव्यवहार करण्यात आला. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले, परंतु अद्याप प्रियेशाच्या कामगिरीची राज्य शासनाकडून साधी दखल देखील घेण्यात आली नाही, प्रियेशा सध्या पुणे येथे पुढील शिक्षण घेत असून नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने नुकताच खास समारंभ आयोजित करून तिचा सत्कार करीत सुवर्ण कामगिरीची कौतुक केले आहे. प्रियेशाच्या कामगिरीबद्दल माहिती देताना तिचे वडील व आरटीओ कार्यालयातील अधिकारी शरद देशमुख यांनी सांगितले की, प्रियेशाला जन्मापासूनच कर्णबधीरतेचा विकार असून तीला डिस्लेक्सियाचा देखील आजार आहे, यामुळे तिला लिहिणे वाचणे शक्य होत नाही, परंतु अनेक अडचणीवर मात करीत शिक्षण घेताना तिला शाळेत असताना नेमबाजी तथा शूटिंगची आवड लागली, त्यामुळे आम्ही तिला प्रशिक्षण शिबिरात दाखल केले. मिश्र दुहेरी दहा मीटर रायफल मध्ये नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविले आहे आणि राज्यशासनाने तिच्या कामगिरीची योग्य दखल घ्यावी, हीच अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *