डॉ. संजय धुर्जड.
२०२० आणि २०२१ हे दोन वर्ष कुणीही विसरू शकत नाही. कोविड महामारी आणि लॉक डाऊनचा परिणाम प्रत्येकाने अनुभवलेला आहे व त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात अशा काही घटना घडल्या आहे की त्या कायमच्या आठवणीत राहणार आहे. विशेष करून आरोग्याविषयीच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवल्या आहेत. शारीरिक तसेच मानसिक आरोग्याशी निगडित काही प्रसंग घडले. एकतर स्वतःला आजार झाला असेल, नाहीतर जवळच्या व्यक्तीला आजार झाल्याने आर्थिक झळ बसली असेल, किव्हा जवळची व्यक्ती दगावल्याने मानसिक खच्चीकरण झाले असेल. व्यवसायातही आर्थिक नुकसान झाल्याने मानसिक दडपणात वाढ झाली असेल. अशा या ना त्या कारणाने हे दोन वर्षे कायमचेच स्मरणात राहतील हे नक्की. परंतु, माझ्यासाठी हे दोन वर्षे एक वेगळ्याच कारणास्तव स्मरणात राहणार आहे. संकटं आली, ती पेलली, निभावून पण नेली, व त्यातून सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन ठेवून सुखरूप बाहेर पडलो. विशेष बाब म्हणजे दोन्ही वर्षात ३ ऑगस्ट ही तारीख कॉमन होती.
२०२० सालच्या मार्च अखेरीस लॉक-डाऊन लागले व कोविड महामारी विरुद्धच्या लढाईला सुरवात झाली. अडीच महिन्यानंतर लॉक-डाऊन उठवण्यास सुरू झाले आणि तसतसे कोविडचा फैलावही सुरू झाला. मला आठवतं, ६ जूनला माझ्याकडे डेंग्यू चे एक पेशंट ऍडमिट झाले. त्याचा उपचार सुरू असतांना त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या आईला दुसऱ्या दिवशी रात्रीला ताप भरला. तातडीने त्या दोघांचे कोविड टेस्टसाठी सॅम्पल घेतले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ तारखेला टेस्टचा रिपोर्ट आला. पेशंट निगेटिव्ह होता परंतु त्याची आई पॉजिटिव्ह होती. आम्ही सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ त्यांना रोज चेक करण्यासाठी आणि शुश्रूषा करण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये जात होतो. डेंग्यूचा पेशंट असल्याने मास्क अथवा PPE किट घालणे गरजेचे नव्हते, म्हणून विनामास्क आणि विना किट त्यांच्याशी संपर्क आल्याने, त्याच दिवशी आम्ही आमचे सर्वांचे सॅम्पल कोविड टेस्टसाठी पाठवले. टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत आम्ही सर्वजण हॉस्पिटललाच मुक्काम केला. इमर्जन्सी पेशंट आहे, म्हणून थांबावं लागणार आहे असे घरी सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १० तारखेला आमचे रिपोर्ट आले. सर्वचजण निगेटिव्ह होते. योगायोगाने त्यादिवशी माझ्या एका मित्राच्या कामानिमित्त मी त्याच्यासोबत महानगरपालिकेत गेलो होतो. साहेब जेवणासाठी गेले असे कळले म्हणून बाहेर गप्पा मारत उभे होतो. तितक्यात महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी असलेले आमचे एक डॉक्टर मित्र आले आणि गप्पा सुरु झाल्या. आम्ही एक हॉस्पिटल शोधतो आहे, जिथे आम्ही कोविड पॉजिटिव्ह पेशंटची डिलिव्हरी, सिजर चे ऑपरेशन करू शकू असे सांगत त्यांनी कोविड हॉस्पिटलसाठी प्रस्ताव मांडला. मी तातडीने नकार दिला. कारण मी स्वतः अस्थिरोग तज्ञ, कोविडबद्दल माहिती नव्हती, भीतीही होतीच आणि जर कोविडसाठी हॉस्पिटल दिलेच तर माझ्या प्रॅक्टिसचे काय होणार, याची चिंता होती. अशा सर्व अडचणींमुळे मी त्यांना नकार दिला, तरी तुम्ही एकदा पुन्हा विचार करा, मी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेन असे सांगून त्यांनी माझ्यापुढे पुन्हा तो प्रस्ताव ठेवला. असे बोलणे झाल्यावर साहेब आले, आम्ही त्यांना भेटून माघारी आलो.
हॉस्पिटलला आल्यावर पुन्हा त्या प्रस्तावाचा विचार केला. असेही माझ्याकडे कोविडचा पेशंट होताच. त्यावेळी कोविडचा उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालय व सरकारी योजना असलेल्या रुग्णालयातील काही खाटा आरक्षित ठेवल्या जायच्या. खाजगी हॉस्पिटलला कोविडचे रुग्ण ऍडमिट करून उपचार करण्याची परवानगी नव्हती. मग माझ्यासमोर दोन पर्याय होते. कोविडच्या पेशंटला सरकारी हॉस्पिटलला पाठवणे, किव्हा स्वतःचेच हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी खुले करावे. पहिला पर्याय सोप्पा आणि निर्धोक होता, तर दुसरा पर्याय अवघड आणि धोकेदायक होता. अगदी जिवाचाच धोका होता. फक्त मलाच नव्हे तर माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या डॉक्टरांच्या व सर्वच स्टाफ च्या जीविताला धोका होणार होता, त्याचीही जबाबदारी माझीच असणार होती. तसा मी सर्वांना कोविड हॉस्पिटलच्या प्रस्तावाची कल्पना दिली, आणि काम करणार का असे विचारताच सर्वांनी लगेचच होकार दिला. तरी त्यांना पुनर्विचार करायला एक दिवस द्यायचे ठरवले. कारण मलाही एकदा विचार करणे गरजेचे वाटले. माझ्या मनात विचार आला, की मी प्रथम एक डॉक्टर आहे आणि रुग्णांचा उपचार करून त्यांची सेवा करणे हा माझा धर्म आहे. मग रुग्ण कुठलाही असो. ज्या समाजात राहून मी सेवा देतो, त्याच्या बदल्यात मी दोन पैसे कमवतो, पोटपाणी चालवतो, त्याच सोबत तो समाज मला मान सन्मान, आदर, प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो तर त्याच्या बदल्यात मलाही काहीतरी देणे आहे. विशेषतः, जेव्हा माझ्या रुग्णांना आणि या समाजाला माझी सर्वात जास्त गरज आहे, त्यावेळी मी त्यांच्याकडे पाठ फिरवू नये, दुर्लक्ष करू नये असे मला जाणवले. म्हणून, हा प्रस्ताव स्वीकारून कोविडच्या रुग्ण ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करण्याची परवानगी घ्यावी यासाठी मी त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने महानगरपालिकेत अर्ज करून तशी परवानगी मागितली.
सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेतले. त्यांचीही तयारी होतीच. आता कामाला लागायचे असे ठरले. कोविडची माहिती मिळवली व ती जाणून घेतली. दोन तीन एम. डी. फिजिशियनशी बोलणे झाले, त्यांनी सेवा देण्याचे आश्वासन दिले. रुग्णाचे नातेवाईकांनी ही विश्वास दाखवला, व आम्ही आमचे पेशंट कुठेही हळवणार नाही, तुम्हीच त्यांच्यावर उपचार करा. परवानगीचा अर्ज दाखल करून मी घरी गेलो. घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितल्यावर नकार येणे अपेक्षितच होता. कारण स्वाभाविक आहे, जीवावर उदार होऊन, स्वखुशीने महामारीच्या होळीत उडी घेणे म्हणजे एक अर्थी आत्महत्याच होती. सर्वच जग ज्याच्यापासून लांब पळून घरात लपून बसले होते, अशा कोविड महामारीला स्वतःहून सामोरे जावे, हा निव्वळ वेडेपणाच. परंतु, मी ठाम होतो. घरच्यांना माझ्या निर्णयाचे कारण समजावून सांगितले. त्यांना माझे म्हणणे पटत होते पण त्यांचे मन मान्य करत नव्हते. मी स्वतःची सर्वतोपरी काळजी घेईन असे सांगून त्यांना मनवले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ तारखेला सकाळी घरून निघालो. पुन्हा घरी येईल की नाही माहीत नव्हते. कारण आता हॉस्पिटलमध्येच रहावं लागणार होतं, घरच्यांपासून दूर. देवाचे दर्शन घेतले, आईच्या व भावाच्या पाया पडून आशीर्वाद घेतांना मन भरून आले. सर्वांच्याच डोळ्यांत पाणी होते. कुणीच काही बोलत नव्हते. धीरगंभीर आणि चिंतेचे वातावरण होते. घरातील एखादा माणूस युद्धावर जातांनाच्या भावना प्रत्येकाच्या मनात होत्या. माझ्याही मनात असेच काहीसे होते, पण निर्णय ठाम होता आणि युद्ध जिंकूनच माघारी येऊ अशी आशा मनाशी ठेऊन घर सोडले. कदाचित याच क्षणासाठी घरच्यांनी मला डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले होते.
कोविड रुग्णांसाठी आम्ही आमचे हॉस्पिटल खुले केले आहे आणि आता आम्ही सेवा देण्यासाठी सज्ज आहोत, आता आम्ही ना नफा ना तोटा तत्वावर सेवा देत आहोत, हे सर्वसामान्यांना कळावे यासाठी मी त्या आशयाचा एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर माझ्या संपर्कातील लोकांना पाठवला. पाहिले तर असे काही होणे शक्यच नव्हते, आणि खरं असेल तर हे सर्वांना कळले पाहिजे असे समजून लोकांनी तो व्हीडिओ आपल्या प्रियजनांना फॉरवर्ड केला. प्रत्येक ग्रुपवर तो व्हीडिओ फॉरवर्ड झाला होता. केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये माझे आणि हॉस्पिटलचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिले असल्याने अनेक लोकांनी ते नंबर्स सेव केले. माहीत नाही भविष्यात कधी गरज पडलीच तर संपर्क करता यावा यासाठी. परंतु, त्यातील अनेकांनी मला व्हाट्सअप्प द्वारे मेसेज पाठवले तर काहींनी कॉल करून माझ्या निर्णयाचे स्वागत करून कौतुक केले. काहींच्या डोळ्यांत अश्रू तरळले, मन सुन्न झाले, अभिमान वाटला, देवपण जाणवले, अशा विविध प्रतिक्रिया दिसल्या. तुमच्या कामात यश येवो म्हणून देवाकडे प्रार्थना करणार, तुमच्या रुपात देव मानवाच्या मदतीसाठी आले आहे, देव नाही पण देवमाणूस बघितला अशा आशयाचे संदेश लोकांनी मला पाठवले. अगदी देवाचीच जागा दिल्याचे जाणवले. यामुळे माझ्यावरील जबाबदारी खूपच जास्त वाढली. आता मागे फिरणे नाही, हेही जाणवले. दुसऱ्याच दिवशी रुग्णांचा ओघ जाणवला. तीनच दिवसांत सर्व हॉस्पिटल फुल झाले. नाशिक शहर, ग्रामीण तसेच नाशिकच्या बाहेरूनही पेशंट्स येत होते. धुळे, जळगाव, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, शिरपूर तसेच मध्यप्रदेशातील सेंदवा, इंदोर, रतलामचेही रुग्ण ऍडमिट झाले.
काम सुरू झाले, परंतु ज्या एम. डी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आश्वासन दिले त्यांनी ऐन वेळी नकार दिला. कारण परिस्थिती इतकी भयानक होती की भीती वाटणे स्वाभाविक होते. सेवा देण्यास त्यांना आम्ही जबरदस्ती तर करू शकत नव्हतो. म्हणून आता आपणच मैदानात उतरावे आणि लढावे असे ठरवले. पावसाळ्याचे दिवस, बाहेर धो धो पाऊस, हॉस्पिटल भरलेले, मोजकाच स्टाफ, नवीन आजार नवीन उपचार पद्धती. कॅप, मास्क, ग्लोज, PPE किट, फेस शिल्ड, शू कव्हर असा पेहराव करून रुग्णसेवा करणे खूपच अवघड होते. सुरवातीला अभ्यास करावा लागला, माहिती घ्यावी लागली, स्टाफला शिकवलं, त्यांना ट्रेन करून हॉस्पिटलची गाडी चालू ठेवली. कोविड मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाजवळ थांबू शकत नव्हते, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त जबाबदारी असायची. त्यातच रुग्णांना जेवण, पिण्यासाठी गरम पाणी, नॅपकिन, टॉयलेटरी चे साहित्य ई. गोष्टी पुरवायला लागल्या. त्यातच, ना नफा ना तोटा तत्वावर सेवा देणार असं आम्ही जाहीर केलं होतं. बड्या हॉस्पिटल मध्ये जिथे २५ ते ५० हजार रोजचे बिल असायचे, तिथे आम्ही फक्त ६ हजार रोजच्या दराने बिल आकारणी केली. दुसऱ्या बाजूने खर्च खूप पटीने वाढला होता. तरीही सेवा सुरूच ठेवली. कोविड रुग्णसेवेचा एक महिना पूर्ण झाला. आमच्या सेवेला यश येत होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी उपचार दिले गेले. मृत्युदर ५ टक्क्यांहून कमी असल्याने आम्हाला आमच्या सेवेबद्दल खात्री झाली आणि आता असेच कार्य पुढे चालू ठेवायचं असं ठरवलं. पहिला टप्पा पार केल्याचे समाधान लाभले. पुढे अजून किती मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे, याची कल्पनाच नव्हती. आपुलकीने सेवा दिल्याचे अनेक रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी बोलून दाखवल्याने आमचा आत्मविश्वास आणखीनच बळावला होता व काम करण्याची नवी उमेद जागृत झाली होती.
तब्बल एक महिन्यानंतर १५ जुलै ला घरगुती वाढदिवसानिमित्त पहिल्यांदा घरी गेलो. केक कटिंग झाले, छान जेवणही झाले. अंगी थोडा थकवा जाणवत होता, म्हणून खूप जास्त सक्रिय होता आले नाही. मी घरी आल्याने सर्वांना आनंद झाला होता आणि मलाही सर्वांना भेटून छान वाटले. सकाळी उठलो तरी थकवा काही गेला नव्हता. मात्र हॉस्पिटलला जाणे गरजेचे होते, जबाबदारी खुप मोठी होती. सकाळी ११ च्या सुमारास घरच्यांचा निरोप घेऊन निघालो. परंतु यावेळी जरा वेगळी परिस्थिती होती. थोडा थकवा होता,उत्साह कमी होता. कारण माहीत नव्हते पण सर्वकाही अलबेल नव्हते, इतकंच जाणवत होतं. तरीही निघालो. तो दिवस नेहमीप्रमाणे परंतु कमी उत्साहात गेला. मात्र १७ तारखेला सकाळी कणकण जाणवू लागली. अंग दुखत होते, डोकं ही धरले होते. मनात शंका आली, बहुदा कोविडची लागण झाली असणार. अशा अवस्थेतही काम सुरू ठेवलं, आणि सोबत गोळ्याही सुरू केल्या. कोविडची टेस्ट केली, आणि टेस्ट पॉजिटिव्ह आली तर सक्तीची रजा घ्यावी लागेल, आयसोलेशनसाठी क्वारांटाईन व्हावं लागेल. मग माझ्या रुग्णांचं काय होईल, त्यांच्याकडे कोण लक्ष देईल या विचाराने मी टेस्ट करणे टाळले. गोळ्याऔषधे घेऊन काम सुरू ठेवलं. माझ्यासोबत काम करणारे एक दोघांनाही थोडा त्रास जाणवू लागला होता, परंतु कुणीही काम बंद करण्यास तयार नव्हते, राजेसाठी विनंती तर सोडाच. सर्वच जण एकमेकांची काळजी घेत होते. एकत्र राहत होते, एकत्र जेवण करत होते, एकमेकांचा औषधोपचार करत होते कारण सर्वच जण हॉस्पिटललाच मुक्कामी होते. एकेक दिवस जात होता. पुढील पाच दिवस त्रास वाढू लागला. ताप, खोकला, अंग डोके दुखत होते, कमजोरी वाटू लागली म्हणून २३ तारखेला छातीचा स्कॅन केला. १०/२५ चा स्कोअर आला, तरीही काम बंद करण्याची इच्छा झाली नाही. असं वाटलं की आणखी दोन चार दिवसांत बरं वाटेल आणि पुढे काम सुरूच ठेऊया.
दोन दिवसांनी अर्थात २५ जुलै ला मात्र त्रास खूपच वाढला. माझा अंदाज चुकत गेला. काम करत असतांनाच खुर्चीत बसल्याबसल्या चक्कर आली आणि मी बेशुद्ध झालो. माझ्या स्टाफने मला त्या अवस्थेत तात्काळ आयसीयू मध्ये ऍडमिट केले. ऑक्सिजन चे प्रमाण कमी झाल्याने बेशुद्ध झालो म्हणून लगेचच ऑक्सिजन सुरू केले, गोळ्या बंद करून इंजेक्शन्स सुरू करण्यात आले. दुपारनंतर मी शुद्धीवर आल्यावर आजूबाजूला नजर फिरवली असतांना मला एक बेड सोडून माझाच मॅनेजर ऍडमिट झाला होता. तो शुद्धीवर होता. अशा अवस्थेतही त्याचे काम सुरू होते. रुग्णांचे कॉल्स अटेंड करत होता, एम.डी. डॉक्टरांना बोलावून पेशंट्स बघायला सांगत होता. माझ्यासाठी तीन डॉक्टर्स बोलावून घेतले, त्यांच्या मार्फत आमची ट्रीटमेंट सुरू केली. अँटीबायोटिक्स, रेमिडीसीवीर, टोसी, स्टिरॉइड्स, रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन सुरू केले. पुढील तीन दिवस माझ्याच हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये माझे उपचार सुरू होते. सर्व स्टाफची धावपळ बघत होतो, सर्वांनी स्वतःला आणि हॉस्पिटलला सांभाळत एकदिलाने काम सुरू ठेवले. मी ऍडमिट झाल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद करावे लागले, परंतु जे रुग्ण ऍडमिट होते त्यांना मात्र उपचार सुरू ठेवले. तिसऱ्या दिवशी स्कॅन पुन्हा करण्यात आला तेव्हा स्कोअर होता १७/२५. ऑक्सिजन सुरूच होते, पण आता मात्र त्याचे प्रमाण वाढले होते. आजार आणि जोखीम दोन्ही वाढलेले असताना माझ्या फिशियनने खबरदारीचा उपाय म्हणून मला मोठ्या हॉस्पिटलला हलवण्यास सुचविले. मी ही विचार केला, आजार नवीन आहे आणि ही महामारी आहे, उपचाराला प्रतिसाद अनियमित आहे, आणि माझ्यासारख्या व्यक्तिच्या उपचाराच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली डॉक्टर्स दबले जाऊ शकतात, हे मला जाणवले म्हणून मी मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट होण्यास तयार झालो, आणि माझ्यासह माझ्या मॅनेजरलाही हलवण्यात यावं असं सांगितलं. कारण त्याच्या जीवाची जबाबदारी माझीच होती. माझ्यासाठी आणि माझ्यासोबत काम करताना त्याला हा आजार झाला होता. अशा वेळी मला त्याला वाऱ्यावर सोडावे, हे माझ्या बुद्धीला पटत नव्हते. इतर स्टाफलाही सांगितलं की ज्यांना ज्यांना आजार होईल आणि त्यांना ट्रेटमेंटची गरज पडेल अशा प्रत्येकाला हॉस्पिटलच्या वतीने खर्च करून उपचार करण्यात यावे.
या सर्व घडामोडी केवळ माझ्या दोघा बंधूंना आणि एका पुतण्याला कळवण्यात आल्या होत्या. घरातील किव्हा नात्यातील कुठल्याही व्यक्तीला याची कल्पना नव्हती. आम्ही दोघेही २९ जुलै ला शिफ्ट झालो. इकडे हॉस्पिटलची मदार उर्वरित स्टाफ वर होती, ती त्यांनी चोखपणे सांभाळली. मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू होती. आयसोलेशन मध्ये मी एकटाच. बाहेरच्या जगाचा संपर्क राहिला नाही. मोबाईल सोबत होता पण ऑक्सिजन चालू असल्याने बोलता येत नव्हते. आवाज खालावला होता, घशाला आणि नाकाला कोरड पडली होती. पालथे झोपून रहावे लागे. मी मनाशी एकच गोष्ट ठरवली, की आपण सावध आणि सतर्क रहावे. स्वतःला सतत कशात तरी व्यस्त ठेवावे. आपल्याला बरं व्हायचं आहे, यातून बाहेर यायचं आहे, इतक्या लवकर हार मानायची नाही. फक्त श्वास घेत रहाणे, डोकं शांत ठेवणे, सकारात्मक विचार करणे, स्वतःची काळजी घेणे परंतु काळजी करू नये, असं स्वतःशी ठरवलं. दहा दिवसांपासून ब्रश नाही, शेविंग नाही, अंघोळ देखील नाही. दम लागे, ऑक्सिजन शिवाय एक मिनिट राहू शकत नव्हतो. असे असतांना स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे होते. अशा वेळी मला माझ्या मोबाईलचा खूप उपयोग झाला. पॉजिटिव्ह अफरमेशन्स, शिव तांडव स्तोत्रं, गीता अध्याय ऐकून विचारांची आणि शरीराची ऊर्जा निर्माण करत होतो. दिपक चोप्रा लिखित गौतम बुद्धांचे ऑडिओबुक ऐकण्याचा योग आला. त्यामुळे मला स्वतःला स्थिर आणि समतोल ठेवता आले. मी डॉक्टर आहे हेही बाजूला ठेवले, मला चेक करायला येणाऱ्या कुठल्याही डॉक्टर किव्हा स्टाफला माझी डॉक्टरकी जाणवू दिली नाही. एक मात्र खरं की, या सर्व कठीण प्रसंगातून जातांना एकाही क्षणी आपले काही बरेवाईट होईल, असा विचार देखील मनाला शिवला नाही. जसजसे बरे वाटू लागले तसतसे ऑक्सिजनची गरज कमी व्हायला लागली. १ ऑगस्ट ला ऑक्सिजन बंद झाले, २ तारखेला सकाळी ब्रश, दाडी आणि अंघोळ केली तेव्हा खऱ्या अर्थाने फ्रेश झालो. परंतु अंगी अशक्तपणा होताच. दहा दिवसांत १० किलो वजन कमी झाले होते. एक दिवस वाट बघून मग डिस्चार्ज देऊ असे डॉक्टर बोलले.
दुसऱ्या दिवशी ३ ऑगस्ट, रविवार होता. २ तारखेला संध्याकाळपासूनच घरून फोन सुरू झाले. कारण दुसऱ्या दिवशी रक्षा बंधनाचा सण होता. घरी बहीण येणार होती, तिचाही कॉल आला होता. संध्याकाळपर्यंत येतो असं सांगितलं. ३ तारीख उगवली, डिस्चार्जची प्रक्रिया सुरू होण्यास दुपार झाली, आणि पूर्ण होण्यास सायंकाळ. सर्व औपचारिकता पार होण्यास ६ वाजले. माझा असिस्टंट मला घेण्यासाठी आला होता. बिल अदा करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तो १० मिनिटांचा प्रवास खूप दिलासादायक होता, एक युद्ध जिंकून परतत आहोत, असेच वाटत होते. आपल्या सुदर्शन हॉस्पिटलला आलो. हॉस्पिटल मध्ये ३ -४ रुग्ण ऍडमिट होते, बाकीच्यांना उपचार पूर्ण करून घरी सोडले होते. हॉस्पिटलची साफसफाई आणि सॅनिटायजेशन सुरू होते. मी पुन्हा हॉस्पिटलला आल्याचे बघून सर्वांना खूप आनंद झाला होता, आणि एका दिव्यातून सर बाहेर आले याचे समाधान अधिक होते. स्टाफ ने केक आणून माझ्या हस्ते कापला, जणू काही माझा पुनर्जन्म साजरा करायचा होता. सर्व स्टाफ आणि पेशंटच्या साक्षीने एक नवपर्व अनुभवायला मिळते आहे, अशी माझी भावना होती. अजून तर घरीही जायचं होतं, रक्षा बंधनासाठी. ड्रायव्हर घेऊन घरी गेलो. कुणालाही कसलीच कल्पना नव्हती की मी कुठल्या वादळातून स्वतःचा बचाव करून आलेलो होतो. मला बघताच सर्वच जण चकित झाले. वजन खूप घटले होते, बारीक झालो होतो, चेहरा उतरलेला, गाल आणि डोळे खपाटीला गेले होते, अशक्तपणा जाणवत होता. माझी माझी विचारपूस करू लागले. कामाची दगदग खूप आहे, म्हणून थकवा आला आहे असे सांगितले. राखी बांधली, पुरणपोळीचे ताट आले, जेवण केले, गप्पा केल्या आणि लगोलग निघण्याची तयारी केली. सर्वांना पुन्हा आश्चर्य वाटले, १५ दिवसांनी घरी आलो होतो, तब्येत खालावलेली जाणवत होती, तरीही एक रात्रही थांबायला गडी तयार नाही. त्यांना कसे सांगू की काय झाले होते. विशेषतः आई, बहीण, पत्नी आणि मुलं यांना कळले तर त्यांना टेन्शन, आणि एकदा जीव वाचल्यावर पुन्हा आणिक त्यात उडी घेतोय, असे समजले तर मला जाऊ दिले नसते, हे मला चांगलेच माहीत होते. एक आठवडा सर्वांनी विश्रांती घेत १० ऑगस्ट पासून पुन्हा सगळे कामाला लागले. आता यावेळी नवीन आणि जास्त जोमाने काम करायचं असंच ठरलं. एकदा बाहेर आलो, आता पुन्हा आजार होण्याची भीती नाही, नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली होती, हे मी ओळखले होते.
२०२० च्या ऑगस्ट मध्ये एका जीवघेण्या प्रसंगातून सुखरूप बाहेर आलो. साधारणपणे असा प्रसंग कुणाच्या जीवनात आला तर यापुढे असल्या मार्गाला जायचं नाही, अशी खूणगाठ बांधली जाते. परंतु, माझे विचार थोडे वेगळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि जीवनाचा प्रभाव असल्याने, त्यांनी अशाच जीवघेण्या प्रसंगातून स्वतःचा बचाव केल्यानंतर विजय साजरा न करता, दुप्पट जोमाने पलटवार करून दुश्मनाला चकित करण्याचे तंत्र अंगीकारलेले महाराज अजीब रसायन होते, हे वेगळे सांगायला नको. मग देवाने माझे प्राण वाचवले आहेत, तर ते माझ्या हातून आणखी मोठे काहीतरी घडावे याकरिता मला जिवंत ठेवले, असे मी समजतो. मी आज जिवंत आहे, यासाठी देवाचे आभार मानून पुढे चालत राहणे हेच योग्य. त्यानंतर साधारणपणे २ महिन्यांनी पहिली लाट ओसरली. २०२० साल संपले आणि २०२१ सुरू झाले. असे वाटले की आता कोरोनाही गेला. नवीन वर्ष नवीन उमेद घेऊन आला. ती उमेद फार काळ टिकली नाही, कारण मार्चमध्ये दुसरी लाट सुरू झाली. यासाठी आम्ही तर सज्ज होतोच, परंतु अधिक सक्षमपणे तयारी होती. टीम वाढलेली होती, पाठीशी दांडगा अनुभव, मनात भरलेला आत्मविश्वास, पहिल्या लाटेत रुग्णांचे मिळालेले आशीर्वाद या जोरावर आम्ही दुसरी लाट रोखण्यास सज्ज होतो. परंतु, ही लाट पहिल्यापेक्षा जास्त वादळी होती. रुग्ण लवकर खालावत असे, त्यात भर म्हणून की काय ऑक्सिजन, औषधे, इंजेक्शन्स, बेड्स चा भयंकर तुटवडा निर्माण झाला. तरीही आम्ही हिम्मत न हरता, सर्व ताकदीनिशी झुंज दिली. ३ महिने सगळीकडे हाहाकार माजलेला. जूनच्या सुरवातीला लाट ओसरली आणि जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले.
कोविडच्या दोन लाटांना थोपवण्यात यश आल्याने आता कुठली चिंता नाही असे वाटत असतांनाच ३ ऑगस्ट २०२१ या दिवशी पहाटे आणखी एक जीवघेणा प्रसंग ओढवला. पहाटे साडेतीन च्या सुमारास छातीत जळजळ होत अस्वस्थता जाणवली. ऍसिडिटी झाली असावी असे पहिल्यांदा वाटले, म्हणून एक ग्लास पाणी प्यायला. १० मिनिट झाले, काही फरक जाणवला नाही, म्हणून आणखी एक ग्लास पाणी पिलो. दोन ग्लास पाणी पिऊनही काही फरक नाही म्हणून मनात वेगळी शंका आली. कोविडमध्ये जी चूक केली ती आता नको म्हणून लगेचच यावर उपाय करावा, असे वाटले. पत्नीला उठवले, हॉस्पिटलला कॉल करून अँबुलंस बोलावून घेतली. घरून निघतांना स्टाफ, मॅनेजर आणि दोघा फिजीशीयनला फोन करून हॉस्पिटलला बोलावले. आम्ही सर्वच जण सोबतच पोहोचलो. तातडीने ECG केला. त्यात अटॅक असल्याचे लक्षात आले. त्यांच्या सांगण्यावरून गोळ्या घेतल्या आणि पुन्हा शांत पडून राहिलो. मला डॉक्टरांनी उपचारातील पर्याय सांगितले. मी निर्णय घेण्यापेक्षा तुम्हीच काय तो योग्य निर्णय घ्या आणि काही इमर्जन्सी प्रोसिजर लागल्यास त्वरित कराव्या, असा निर्णय मी त्यांना दिला. लगेच मला अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्याची सुविधा असलेल्या हॉस्पिटलला हलवले. हृदयाची सोनोग्राफी करून लगेचच कॅथलॅब मध्ये शिफ्ट केले. तेथील डॉक्टरांना आधीच कळवले असल्याने तेथील टीम सज्ज होती. मला डॉक्टरांनी सांगितले की आपल्याला इमर्जन्सी अँजिओग्राफी करायची आहे, आणि त्याच्या रिपोर्टनुसार पुढील निर्णय घ्यायचा आहे. मी संमती दिली. अँजिओग्राफीच्या रिपोर्ट मध्ये एक रक्तवाहिनी ब्लॉक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे लगेचच अँजिओप्लास्टी करायचे ठरले व तसेच करण्यात आले. मला त्रास जाणवू लागल्यापासून एक तासाच्या आत, म्हणजे साडेचारला मी कॅथलॅब मध्ये होतो आणि पुढील अर्ध्या पाऊण तासात अँजिओप्लास्टी करून झाली देखील.
पुन्हा एकदा ३ ऑगस्ट माझ्यासाठी पुनर्जन्माचा दिवस ठरला होता. बरोबर दोन वर्षापूर्वी २०२० मध्ये मी कोरोनावर मात करून घरी परतलो होतो आणि मग २०२१ च्या ३ ऑगस्टला एका हार्ट अटॅक मधून बचावलो होतो. अटॅक कशाने आला, मला माहित नाही. मला ब्लड प्रेशर नाही, मला डायबेटीस नाही, मला थायरॉईड नाही, खुप जास्त स्थूलता नाही. असे असूनही हार्ट अटॅक येऊ शकतो यावर विश्वास बसत नाही. पण, असो. अटॅक जरी असेल, परंतु आता मी त्यातून बाहेर आलो आहे, हे काय कमी आहे का ? पुन्हा एकदा देवाची आणि दैवाची साथ मिळाली. त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे अशा बाका प्रसंगी मदतीसाठी धावून येणारे जिवाभावाचे माणसं. हीच तर खरी दौलत असते ना. एक दीड तासांत एव्हढी यंत्रणा हलते, वेळेत सर्व काही होते, जीव वाचतो यात नक्कीच या माझ्या जिवलग मित्र, सहकारी डॉक्टर्स, स्टाफ, कुटुंबीय आणि अप्रत्यक्षपणे माझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या पडद्यामागील लोकांचे योगदान आहे. एक वर्षाच्या कालावधीत दोनवेळा जीवावर ओढवलेले प्रसंगातून सहीसलामत बाहेर येणे यात मला माझे काही दिव्य आहे, असे न समजता, मला वाटते की यात निश्चितपणे देवाने काहीतरी योजिले असणार आहे.
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, या दोन्ही आजारातून बाहेर येतांना मला आराम करावा लागला. पण तो वेळ झोपून वाया घालवण्यापेक्षा काहीतरी नवीन वाचावं, शिकावं, जाणून घ्यावं असंच वाटलं. म्हणून मी असं ठरवलं होतं की हा वेळ मी थोर महापुरुषांना जाणून घेईन. त्यांच्याबद्दल माहिती घेईन, त्यांची जीवन यात्रा, त्यांचे विचार, त्यांनी केलेले कार्य, आणि समाजाला आणि एकंदर या मानवजातीला दिलेले योगदान जर जाणून घेतले तर या वेळेचा सदुपयोग करता येईल. पहिल्या आजारच्या वेळी मी भगवान गौतम बुद्ध, आणि महात्मा गांधी यांची माहिती मिळवली, तर दुसऱ्या वेळी आचार्य चाणक्य, सम्राट अशोक आणि संभाजी महाराजांच्या जीवनावरील मालिका बघितल्या. त्या बघताना इतका स्वतः हरवून जायचो की कशी रात्र सरायची, कळायचेही नाही. यामुळे मला आपल्या देशाचा दैदिप्यमान इतिहास समजला. थोर महापुरुष कळाले. त्यांचे विचार आणि योगदान समजले. माझ्या पुढील जीवनाच्या वाटचालीत निश्चितपणे त्याचा खूप मोठा प्रभाव असणार आहे. माझ्या हातून काही मानवहिताचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी देवाने माझ्या आजारांच्या माध्यमातून मला मार्ग दाखवला आहे, असे मी समजतो.
मला जाणवलेल्या काही गोष्टी नमूद करावयाच्या आहेत
* वयाची पन्नाशी जवळ आली आहे, याची आठवण करून दिली.
* जीवन अनमोल आहे, आरोग्य तर त्याहून अधिक. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायला नको.
* शरीर आपल्याशी काही सांकेतिक भाषेत सांगायचा प्रयत्न करत असते. कुठलाही आजार लगेच होत नसतो, तो हळू हळू वाढतो. आपण दुर्लक्ष करतो म्हणून तो आपल्याला अचानक झाला आहे असे वाटते.
* प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याचे दोन बाजू असतात, एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. नकारात्मक दृष्टिकोनातून बघितले तर प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो, तर सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले तर पर्याय आणि उपाय दिसतात.
* आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत, त्यामागे काहीतरी कारण आहे. या जन्माला काहीतरी उद्देश आहे, हेतू आहे. तो ओळखावा म्हणजे जीवन सार्थकी लागेल.
* कठीण प्रसंगातून जाणे म्हणजे त्रास नव्हे. त्याने तुमची परीक्षा घेतली जाते, तुमची ताकद आणि क्षमता वाढते.
*डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732