सय्यद पिंप्रीतील प्रेरणास्थान; विचारांचा वारसा कायम टिकून
सिडको : दिलीपराज सोनार
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे
केवळ संविधानाचे शिल्पकार किंवा सामाजिक समतेचे प्रतीक नसून, अनेकांच्या जीवनात प्रेरणेचा स्रोेत ठरले आहेत. त्यांच्या विचारांचे व कार्याचे जतन करणे, हे
केवळ ऐतिहासिक कर्तव्य नाही, तर समाजासाठी एक संस्कारप्रधान संदेश आहे. नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री गाव या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण येथे बाबासाहेबांच्या अस्थींचा पवित्र स्तूप धम्मवस्तीत उभारण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची मैत्री इतिहासात सुप्रसिद्ध आहे. या मैत्रीच्या आठवणी जपणारे सिद्ध पिंप्रीचे भूमिपुत्र पी. एल. लोखंडे हे बाबासाहेबांचे खंदे समर्थक होते. डॉ. आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचे जतन करण्याचे श्रेय दादासाहेब गायकवाड आणि पी. एल. लोखंडे यांनी घेतले. नाशिकपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या सय्यद प्रिंपी या गावात स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुंदर स्तूप उभारला गेला. तेथे 30 मे 1958 रोजी बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचे रोपण करण्यात आले. स्तूपाच्या लोकार्पणप्रसंगी मुकुंदराज आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, पी. एल. लोखंडे आणि गावातील नागरिक उपस्थित होते. स्तूपाच्या मागच्या बाजूला मुकुंदराज आंबेडकर यांच्या हस्ते बोधिवृक्ष लावण्यात आला होता. तो आजही तितकाच पवित्र आणि जिवंत आहे. दरवर्षी 30 मे या दिवशी या ठिकाणी वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा स्थानिक समाजात कायम टिकून राहतो.
गेल्या 15 वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून सय्यद पिंप्री येथील स्तूपाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी 14 एप्रिल व 6 डिसेंबर या दिवशी अनुयायांंची उपस्थिती विशेष वाढली आहे. जे समाजबांधव 6 डिसेंबर रोजी दादर
(मुंबई) येथील चैत्यभूमीवर जाऊ शकत नाहीत, ते सय्यद पिंप्रीला येऊन बाबासाहेबांना मानवंदना देतात. स्थानिक युवा मंडळी व समाजबांधव यावेळी सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष व्यवस्था करतात.
प्रेरणेचे प्रतीक
कर्मवीर दादासाहेब गायकवाड, पी. एल. लोखंडे आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून उभारलेला हा स्तूप केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर समाजासाठी प्रेरणास्थान ठरला आहे. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे जीवन, सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य आणि शिक्षणाचे महत्त्व याठिकाणी नेहमीच अनुभवता येते. अशा ठिकाणी जाऊन आपल्याला फक्त इतिहासाचा अनुभव नाही, तर समाजसेवेची, समतेची आणि मानवतेची जाणीवही होते. सहा डिसेंबरला नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंच्या अस्थींच्या स्तूपास मानवंदना देऊन त्यांचा आदर व्यक्त करणे, ही केवळ परंपरा नाही, तर प्रत्येक समाजबांधवाचे कर्तव्य आहे. हा स्तूप आजही आपल्या समाजासाठी प्रेरणेचे प्रतीक आहे आणि समाजातील नवतरुणांसाठी मूल्यांचा मार्गदर्शक आहे.