त्र्यंबकेश्वरला सुट्ट्यांमुळे व्यवस्था कोलमडली

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर
त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून पडल्याचे पहिल्याच दिवशी निदर्शनास आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात काय होणार? याबाबत शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. साधुमहंतांनीही नापसंती व्यक्त केली आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात येणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविकांनी वाहने उभी केल्याने शुक्रवारी दिवसभर वाहतुककोंडी झाली. सायंकाळच्या सुमारास त्याचा कडेलोट झाला आणि शहरात आत येण्यास अथवा शहरातून बाहेर जाण्यास वाहनचालकांना किमान दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. शहरात जागोजागी वाहने उभी केलेली दिसत होती. दर्शनासाठी पाच ते सात तास रस्त्यावर थांबावे लागले. तोपर्यंत उभ्या असलेल्या वाहनांनी समस्या निर्माण केल्या. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पश्चिम बाजूला असलेल्या दरवाजात कर्मचारी आणि भाविक यांच्यात तुंबळ हाणामारी झालेली पाहून अनेक भाविकांनी काढता पाय घेतला. उत्तर दरवाजासमोर देखील कर्मचारी आणि भाविकांंच्यात झालेल्या हाणामारीचे समाज माध्यमात दर्शन घडत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात यापेक्षा जास्त गर्दी होणार आहे. तेव्हा त्या गर्दीला कशा प्रकारे सामोरे जाणार याबाबत चर्चा होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *