देशावर दहशतवाद्याचे ‘सावट’ न परवडणारे!

बिहार निवडणुकीच्या एक दिवस आधी फरिदाबाद येथे जवळपास दोन हजार 900 किलो वजनाची स्फोटके, तसेच ऐक-47 रायफलसारखी घातक शस्त्रे आपल्या यंत्रणांनी पकडली. त्याचे काश्मीर कनेक्शनदेखील उघड झाले. फरिदाबादमध्ये डॉक्टरीपेशा असलेले महाभागदेखील अशा देश विघातक कृत्यांमध्ये सापडत आहेत. फरिदाबाद, लखनौ येथून अनेकांना अटक झाली आहे. यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश केला आहे.
डॉक्टरीपेशासारख्या व्हाइट कॉलर व्यवसायाच्या आडून अशी दहशतवादी कृत्ये करणे गंभीरच आहे. अपेक्षेप्रमाणे याचे ’जैश-ए-मोहम्मद’ आणि अन्सार गझवात ऊल हिंद या दहशतवादी संघटनांशी संबध असल्याचे उघड झाले. हे मोठे यश मिळाले असतानाच दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी संध्याकाळी गर्दीच्या वेळी लाल किल्ला, चांदनी चौक परिसरात एका कारमध्ये स्फोट झाला आणि अनेक वाहनांचे नुकसान तर झाले. मात्र, नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. हे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेले कृत्य आहे की नाही, याचा उलगडा लवकरच होईल. एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या मृत्युकांडाचा बदला ऑपरेशन सिंदूर करून भारताने घेतला आणि पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना चांगलीच अद्दल घडवली. सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. अशीच कारवाई पुलवामाच्या वेळीदेखील केली गेली होती. पाकची आर्थिक नाकेबंदी केली, कोंडी केली. मात्र, तरीदेखील अधूनमधून दहशतवादी भारतात हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत झालेला स्फोट हे दहशतवादी कृत्यच आहे, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. यातील आका सीमेपलीकडील आहे का त्या दिशेने तपास जात आहे. हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय कट रचला गेला होता का? भारताने आजवर दहशतवादाची मोठी किंमत मोजली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्याने अशी गंभीर घटना काही वर्षांपासून घडली नव्हती. यापूर्वी 2011 मध्ये दिल्ली उच्च न्यायालय परिसरात सुटकेसमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन 15 जणांचा मृत्यू, तर 80 जण जखमी झाले होते. दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने दिल्लीला वारंवार लक्ष्य केले जात आहे. 1996 मधे लजपतनगर मार्केट, 1997 सदर बाजार, करोल बाग, चांदनी चौक येथे बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. 2005 मध्ये पहाडगंज, गोविंदपुरी येथे दिवाळीच्या तोंडावरच स्फोट झाला होता आणि त्यात 68 जणांचा मृत्यू व दोनशेहून जखमी झाले होते. 2008 मध्ये कॅनॉट प्लेस, करोलबाग परिसरात स्फोट होऊन 20 जणांचा मृत्यू झाला होता. अकरा वर्षांनतर पुन्हा दिल्लीला लक्ष्य केले गेले. दिल्लीबरोबरच मुंबईसारख्या अनेक शहरांनी दहशतवादी हल्ल्याचे घाव सोसले आहेत. संसदेवरील हल्ला, मुंबईमधील 9/11 चा हल्ला, बॉम्बस्फोटाची मालिका, जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने घडणार्‍या घटना, याची मोठी किंमत आजवर भारताने मोजली आहे.
पाक पुरस्कृत दहशतवाद ही अनेक वर्षांपासूनची भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे. आजवर हजारो जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात मोठी जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तर कायमच अशांतता राहिली आहे. आजही परिस्थिती काहीशी नियंत्रणात असली, तरी दहशतवाद संपलेला नाही. सीमेपलीकडून होणार्‍या दहशतवाद्याला काही दुष्प्रवृत्ती, घरभेद्यांचे बळ लाभते, हे वास्तव आहे. विशेषतः काश्मीरमधील फुटीरतावाद्यांकडून. त्याचबरोबर या मुद्द्यावरून कायमच एका धमीर्र्यांच्या लोकांना खलनायक ठरवले जात असून, देशद्रोहाचा शिक्का मारला जात आहे. त्याचबरोबर काश्मीर प्रश्नाचे खापर गांधी-नेहरू-काँग्रेस यांच्यावर फोडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रचार-अपप्रचार केला जात आहे. मात्र, या परिस्थितीला आपण सगळेच कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहोत.
सन 2018 मध्ये पुलवामा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लष्करी जवान शहीद झाले होते. त्यावेळी घर मे घुसकरची भाषा करत सर्जिकल स्ट्राइक केला गेला. त्यानंतर काश्मीरमधील कलम 370, 35-अ हटवून दहशतवाद आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. तसे दावेही केले गेले. मात्र, तरीदेखील अधूनमधून दहशतवादी भारतात हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवर्षी पहलगामजवळच्या बेसरन घाटीत पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्याचा बदला घेतला गेला आणि ऑपरेशन सिंदूरचा मोठा गाजावाजा झाला. वाटले होते आता दहशतवादी भारतात परत हिंमत करणार नाही. मात्र, दिल्लीतील घटनेने दहशतवादी पुन्हा डोके वर काढत आहेत का, असा प्रश्न पडतो. यानिमित्ताने देशातील अनेक घरभेद्यांची नावे समोर येत आहेत. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याचवेळी गेल्या काही वर्षांपासून देशात एका विशिष्ट धर्माला खलनायक बनवण्याचा प्रयत्न होत आहे. कपड्यावरून ओळख केली जात आहे. अस्सी-बीसच्या राजनीतीची भाषा केली जात आहे. जणू काही धमीर्र्य हे भारताचे नागरिक नाहीत, तर देशद्रोही आहेत, त्यांच्या मतांची गरज नाही, पाकिस्तानात चालते व्हावे, अशी भाषा केली जाते. यामुळे काही वर्गांमध्ये विद्वेषाची भावना वाढीस लागते आहे का आणि विद्वेषवृक्षाला अशी विषफळे येत आहेत का, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. दिल्लीतील घटनेने दहशतवादी पुन्हा डोके वर काढत आहेत का? पुन्हा देशावर दहशतवाद्याचे सावट घोंघावू लागले आहे का? दहशतवादी हल्ला होणे ’गांभीर्याने’ घेण्याची गरज आहे. याबाबत कुठलेही राजकारण होऊ नये आणि सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. असे चित्र दिसायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *