युद्धभूमीचा थरार… शत्रूच्या उरात धडकी…

 

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशनची पासिंगआउट परेड

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
गर्द झाडीतून वेगाने येत क्षणार्धात हवेत गिरकी घेऊन शत्रूच्या दिशेने कूच करणारे हेलिकॉप्टर… युद्धस्थळी वैद्यकीय सेवेची तत्परता… धडधड आवाज करीत शत्रूच्या तळाच्या दिशेने जाणारे रणगाडे… हेलिकॉप्टरमधून उतरणारे सैनिक, तोफांचा मारा… कानठळ्या बसविणारे तोफांचे आवाज… अवघ्या काही फुटांवर फुटणारे बॉम्ब… जागोजागी बॉम्बमुळे लागलेले आगडोंब.. जीवावर उदार होऊन देशाचे रक्षण करणारे सैनिक यासोबत चेतक, चित्ता या हेलिकॉप्टरचे भेदक आगमन… जणूकाही युद्धभूमीवर प्रत्यक्ष युद्धच सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी (दि.21) नाशिककरांना पाहायला मिळाले.

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट) येथे शिस्तबद्ध पासिंगआउट परेड अत्यंत उत्साहात पार पडली. या परेडचे अध्यक्षस्थान जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, कमांड लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी भूषविले. लष्करी विमान प्रशिक्षणातील विविध महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांच्या यशस्वी पूर्णतेचा हा ऐतिहासिक टप्पा ठरला.
एअर शोदरम्यान नाशिककरांना हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक कसरती दाखविण्यात आल्या. त्यावेळी ’ऑपरेशन विजय’चा थरार लक्षवेधी ठरला. युद्धप्रसंगी हेलिकॉप्टरमधील आणि जवानांची चपळाई युद्ध प्रसंगातील तत्परता यावेळी प्रात्यक्षिकांतून दाखविण्यात आली. हेलिकॉप्टरद्वारे शत्रूच्या गोटात शिरून त्याचा होणारा खात्मा, जखमी जवानाला दोरखंडाच्या सहाय्याने हेलिकॉप्टरमध्ये घेण्याचा प्रसंग आणि चित्ता, चेतक, रुद्र या लढाऊ हेलिकॉप्टर्सचा थरार अनुभवताना उपस्थित थक्क झाले. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच तेथे रणगाड्यांचेही शक्तिप्रदर्शन दाखविण्यात आले. रणगाडे युद्धाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यातून जवानांनी शत्रूच्या तळावर मारा केला. त्याचवेळी रुद्र या लढाऊ हेलिकॉप्टरची गस्त हवेत सुरू होती. शत्रूच्या गोटात शिरून ’ऑपरेशन फत्ते’ करण्यात कसा महत्त्वपूर्ण ठरतो, हे पाहताना उपस्थितच्या अंगावर शहारे आले.

हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिके

’चित्ता’, ’चेतक’, ’ध्रुव’ आणि ’रुद्र’ या लढाऊ हलिकॉप्टरचे जारदार शक्तिप्रदर्शन, हवेत स्थिर राहणारे लढाऊ हेलिकॉप्टर्स, जमिनीच्या दिशेने आणि अवकाशात अगदी सरळ रेषेत झेपावताना चित्तथरारक कसरती, रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्टने युद्धस्थळाची पाहणी केली. नाशिककरांना ’एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम’मधील कामकाज स्क्रीनवर दाखविण्यात आले. एटीसी’तून ’रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट’ला कमांड देण्यात आल्या. लढाऊ हेलिकॉप्टरमधून युद्धाच्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ, तोफा पुरविण्यात आल्या. या सोहळ्याच्या अखेरीस सर्व लढाऊ हेलिकॉप्टर्सला ’वॉटर सॅल्यूट’ देण्यात आला
यावेळी कॉम्बॅट आर्मी एव्हिएटर्स कोर्स, आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स आणि संयुक्त अंतर्गत पायलट व ऑब्झर्व्हर कोर्सच्या पहिल्या बॅचचे अधिकारी एकाचवेळी उत्तीर्ण झाले. या तीनही कोर्सचा एकत्रित समारंभ हा कॅटच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे. लष्करी विमानचालन क्षेत्रात अधिक बळकट समन्वय आणि एकत्रित प्रशिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात म्हणून हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अधिकार्‍यांनी सखोल सैद्धांतिक अभ्यास, आधुनिक सिम्युलेशन तंत्रज्ञान, तसेच हेलिकॉप्टर आणि आरपीएएस प्लॅटफॉर्मवरील प्रत्यक्ष ऑपरेशनल उड्डाण प्रशिक्षण पूर्ण करून पात्रता संपादन केली. उपस्थितांना संबोधित करताना, ले. जनरल धीरज सेठ यांनी नव्या अधिकार्‍यांचे
मनःपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले की, मॅन्ड-अनमॅन्ड टीमिंग, प्रिसिजन स्ट्राइक क्षमता, प्रगत निरीक्षण आणि आरपीएएस आधारित युद्ध तंत्रामुळे आधुनिक युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर कॉम्बॅट एव्हिएटर्स आणि आरपीएएस पायलटची भूमिका अधिकाधिक निर्णायक होत आहे. गुंतागुंतीच्या भौगोलिक रचनेत, आपत्कालीन वैद्यकीय हालचाल, फायरपॉवर आणि धोरणात्मक तैनातीमध्ये हेलिकॉप्टर्सची अपरिहार्यता त्यांनी अधोरेखित केली.
भारतीय सैन्यामध्ये सुरू असलेल्या तांत्रिक परिवर्तनाचा उल्लेख करताना, आर्मी कमांडर म्हणाले की, मॅन्ड-अनमॅन्ड प्लॅटफॉर्मचे वाढते एकत्रिकरण मल्टि-डोमेन ऑपरेशन्सचे वाढते महत्त्व, आधुनिक युद्धतंत्राशी सुसंगत प्रशिक्षण पद्धतींचे नवे ढाचे या क्षेत्रात आरपीएएसने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. आरपीएएस ऑपरेशन्स आणि कॉम्बॅट एअर मॅन्युव्हरसाठी कॅटला ‘सेंटर ऑफ एक्स्पर्टाइज’ असा मान मिळाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. रिव्ह्यूइंग ऑफिसर यांनी नव्या अधिकार्‍यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, व्यावसायिक शिस्त व सुरक्षिततेबद्दल दृढ वचनबद्धता जपण्याचा सल्ला दिला. तुम्ही भारतीय लष्कराच्या भविष्यातील हवाई क्षमतेचे नेतृत्व करणार आहात, असे ते म्हणाले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *