पंचवटी : वार्ताहर
एकीकडे वाहतूक पोलिसांच्या नावाने बोट दाखवले जात असतानाच, वाहतूक शाखेत असेही कर्मचारी आहेत की, ते आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक कर्तव्याचे भान जपत आहेत. बळी मंदिर परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे बळी मंदिर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी
बुजवले.
शहर परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यातच बळी मंदिर चौकातील चौफुलीवर वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक कर्मचार्यांना चांगलीच कसरत करावी लागते. परंतु, याच भागातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांनादेखील त्रास सहन करावा लागत असून, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने या भागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बळी मंदिर चौकातील कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार विशाल बधाने, सोपान पवार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना रस्त्यावरील खड्डे बुजवले.त्यामुळे परिसरातील नागरिकांनीदेखील त्यांच्या या कृतीचे स्वागत केले आहे.