झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा उद्यान विभागाच्या कामकाजाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता नागरिकांनीच धोकादायक झाडांचे फोटो पाठविण्याची टुम उद्यान विभागाने काढली आहे.

गुलमोहोर व परदेशी झाडे कोसळून नुकताच दोन तरुणांचा मृत्यू झाला. यापूर्वीही झाडे कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अवकाळी पावसामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांत किमान सातशे ते आठशे झाडे कोसळली आहेत. 7 जूनपासून पावसाळा सुरू होईल. त्याच्या आत धोकादायक ठरणार्‍या झाडांची छाटणी करण्याची गरज आहे. शहरातील गंगापूर रोड, सिडको, त्र्यंबकेश्वर रोड, शिवाजीनगर, ध्रुवनगर या भागांत अनेक झाडे धोकादायक आहेत. त्यात गुलमोहराची झाडे अतिशय ठिसूळ असल्याने अल्पशा पावसाने तसेच वार्‍यानेही कोसळतात. मागील आठवड्यात झाडे कोसळून दोन जणांचा बळी गेला, तर अनेक वाहनांवर कोसळल्याने नागरिकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागला. मनपाच्या उद्यान विभागाने यापासून बोध घेत धोकादायक झाडे तातडीने तोडण्याची गरज आहे.

गंगापूर रोडवरील भररस्त्यात असलेल्या झाडांचा प्रश्न अजूनही कायम आहे. रात्रीच्या वेळी ही झाडे लक्षात येत नाहीत. समोरून येणार्‍या वाहनांच्या प्रकाशात झाड न दिसल्यास अपघात होण्याचा धोका आहे. पर्यावरणप्रेमींचा झाडे तोडण्यास विरोध असला, तरी नागरिकांचा जीव जात असताना पर्यावरणप्रेमींना त्यांच्याशी काहीही देणे-घेणे दिसत नाही. महापालिकेने पर्यावरणप्रेमींना विश्वासात घेऊन धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी तोडण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *