नाराजीनाट्याचा बुरखा

राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती निष्ठावन आहोत, हे दाखविण्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच असते; परंतु तोच पक्ष राजकीयदृष्ट्या अस्थिर होतो. यावेळी मात्र हेच नेते दुसर्‍या पक्षात टणकन उड्या मारण्यात अग्रणी असतात. असो. सध्या नाशिकमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी काहीही दिलासादायक घडताना दिसत नाहीये. पक्षात थांबण्यापेक्षा भविष्यातील राजकीय सोयीसाठी माजी नगरसेवक व पदाधिकारी पक्ष सोडत आहेत. दरम्यान, माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांचे नाराजीनाट्य काही केल्या संपत नसल्याचे पाहून सुधाकर बडगुजरांप्रमाणेच त्यांचीही पक्षाने हकालपट्टी करून पदावरून बाजूला करत मामा राजवाडे यासारख्या सामान्य शिवसैनिकाच्या खांद्यावर महानगरप्रमुखपदाची धुरा सोपवली. विलास शिंदे शिंदेसेनेत जाणारच हे पाहून अपरिहार्यतेने का होईना त्यांना पदावरून दूर केले गेले. दरम्यान, माध्यमांसमोर बोलून नाराजी व्यक्त केल्याने पक्षाकडूनच कारवाई होत असल्याचे बडगुजर प्रकरण पाहून या नाराजीनाट्याचा विलास शिंदे यांनीही आधार घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण सत्ताधार्‍यांच्या दिशेने फिरू लागले असून, पुढे यात आणखी काय-काय घडामोडी घडणार, हे पाहावे लागणार आहे.

विलास शिंदे आज, रविवारी (दि. 29) पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. काही दिवसांपासून शिवसेना उबाठाकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभाग बैठका घेतल्या जात असताना, शिंदे यांची अनुपस्थिती दिसून येत होती. यावरूनच शिंदे पक्ष सोडणार, हे स्पष्ट होते; परंतु तरीही प्रारंभी ठाकरे गटाने त्यांच्याबाबत विश्वास दाखवला. ज्या दिवशी सुधाकर बडगुजर यांची भरपत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी उपनेते दत्ता गायकवाड यांना फोन करून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले, त्यावेळी पत्रकार परिषदेत विलास शिंदे यांची उघडपणे नाराजी दिसली होती. तसेच आपण नाराज आहोत की नाही याबाबत येत्या काही दिवसांत भूमिका मांडणार असल्याचे माध्यमांना त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे, सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांसमोर विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा पदाधिकारी नाराज असल्याचे सांगितले असता, बडगुजर यांची दुसर्‍याच दिवशी पक्षातून हकालपट्टी केली. शिंदे यांनीही माध्यमांवर काही वेळा नाराजी दर्शवली होती. त्यांची मात्र तेवढ्या तत्परतेने हकालपट्टी करण्यात आली नाही, हे विशेष. मात्र, शिंदे पक्ष सोडणारच असे समजल्यावर त्यांची महानगरप्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, विलास शिंदे यांचा वेळोवेळी सुधाकर बडगुजर यांच्यावर रोख दिसला आहे. जी पदे आपल्याला मिळ्णार ती बडगुजरांमुळे मिळाली नाहीत, अशी भावना त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. विलास शिंदे महानगरप्रमुख असताना त्यांनी कधी विभागप्रमुखांची साधी बैठकही घेतली नाही, असा आरोप त्यांच्यावर ठाकरे गटातील काही पदाधिकार्‍यांकडून होतो आहे. त्यांनी पक्षसंघटनेसाठी काही केले का? उलट पक्षाने त्यांना भरभरून दिले, असे म्हटले जात आहे. दरम्यान, उबाठातील स्थिती का ढासळ्त आहे, याचे पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एक-एक महत्त्वाचे नेते पक्षाला सोडचिठ्ठी का देत आहेत, याचा सुगावा घ्यावा लागेल. अन्यथा जे आउटगोईंग सुरू आहे, ते तसेच सुरू राहील. त्यात कुठलाही बदल होणार नाही. विशेष म्हणजे, शहरात न भूतो न भविष्यति असे नुकसान झाले आहे. पक्ष अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभे राहण्याचे सोडून सोयीस्करपणे दुसर्‍या पक्षाशी संधान बांधले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उबाठातून पक्षांतराची रांग लागली आहे. सुधाकर बडगुजर यांच्या मुलावरील व इतर चौकशीमुळे हतबल झाल्याने त्यांच्यासमोर पर्याय नसल्याचे खुद्द ठाकरे गटातीलच काही पदाधिकारी सांगत आहेत. उबाठात राजकीय भवितव्य नाही, अशी मनाशी खूणगाठ बांधत शिंदेदेखील पक्षांतराच्या निर्णयापर्यंत आल्याचे बोलले जाते. त्यांच्या नाराजीला जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी निमित्तमात्र मिळाले. समजा, राज्यात अखंड शिवसेना आजही सत्तेत असती तर विलास शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असती का? किंबहुना बडगुजर यांच्यावरही दडपण नसते की त्यांनी पक्ष सोडण्यासाठी स्वत:हून खटपट केली नसती. मात्र, हा काळाचा महिमा असून, सध्याच्या राजकारणात काही केले तरी सर्व माफ, हा जणू नव्याने पायंडा पडला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या द़ृष्टीने विलास शिंदेंसह त्यांच्या प्रभागातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, होऊ घातलेली महापालिकेची निवडणूक सहज जिंकता यावी याकरिता उबाठातील माजी नागरसेवक सत्ताधारी शिंदेसेना व भाजपचा पर्याय स्वीकारत आहेत. यात बहुतेकांनी शिंदेसेनेला प्राधान्य दिले आहे. कारण भाजपमध्ये मोठ्या संख्येने माजी नगरसेवक आहेत. भाजपपेक्षा शिंदे गटात प्राधान्य मिळेल, या हेतूने उबाठातील माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेशासाठी पसंती देत आहेत. 2017 साली भाजप व शिवसेना या सत्तेतील पक्षांतच मनपासाठी सरळ लढत झाली. त्यावेळी युतीतील नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्ष मनपा निवडणुकीच्या द़ृष्टीने समोरासमोर उभे ठाकणार आहेत. दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने भाजपला एकहाती सत्ता आणायची आहे. केवळ सत्ताच नव्हे, तर नव्वदहून अधिक नगरसेवक त्यांना निवडून आणायचे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिंहस्थ प्राधिकरणाद्वारे दूर करण्याचा करेक्ट कार्यक्रम भाजपने केला आहे. प्राधिकरण नसते तर नगरविकास खात्याचा कारभार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे. त्यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेतली असती, अशी भीती भाजपला असल्याचा दावा शिंदे गटातील नेते करत आहेत. मात्र, नाशिक महापालिकेत स्वबळावर सत्ता आणून आमचा महापौर बसवू, असा दावाही शिंदे गटात केला जाऊ लागला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष लक्ष घालणार आहेत. त्याची तयारी म्हणून शिंदे गटाला साठ प्लसची मॅजिक फिगर गाठायची आहे. इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अवस्था खिळखिळी झाली आहे. जे काही माजी नगरसेवक आहेत व निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक पदाधिकारी आहेत, त्यांचे मनोधैर्य ढासळत आहे. मात्र, जे होईल ते पाहू असे म्हणून संघर्ष करण्याची तयारी उबाठातील पदाधिकार्‍यांची आहे. जे गेले ते बरे झाले, नव्या चेहर्‍यांना संधी मिळेल, असा विश्वास पक्षातील ज्येष्ठ नेते व्यक्त करत आहेत. मात्र, सध्याच्या घडीला राजकारणाची दिशा कमालीची बदलली असून, राजकारणाचे व्यावसायिकीकरण होत असल्याचे चित्र आहे.

गोरख काळे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *