प्रभाग विकसित, पण मूलभूत समस्यांमुळे नागरिक त्रस्त!

लक्ष्यवेध : प्रभाग-25

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 25 हा सध्या
चर्चेचा विषय ठरत आहे. रायगड चौक, पाटीलनगर, सावतानगर, उंटवाडी गाव, त्रिमूर्ती चौक, अभियंतानगर, इंद्रनगरी, हेडगेवार-नगर, कामटवाडे गाव, श्रीरामनगर आणि सूर्योदय कॉलनी या परिसराचा समावेश आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 52,308 आहे. त्यात अनुसूचित जाती 4,009 आणि अनुसूचित जमाती 1,982 अशी लोकसंख्या आहे. शहरातील सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून प्रभाग 25 ची ओळख निर्माण झाली असली, तरी अद्याप काही मूलभूत कामे रखडलेली आहेत. त्यावर नागरिकांमध्ये असंतोष दिसतो.
गेल्या काही वर्षांत या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, जलकुंभ उभारणी, नाल्याला गॅब्रियन वॉल बांधून त्यावर जॉगिंग ट्रॅकची निर्मिती, पाटीलनगरमधील उद्यान आणि मैदानाचे सुशोभीकरण, तसेच भूमिगत वीजतारा यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. पाटीलनगर उद्यान हे एकेकाळी असामाजिक घटकांचे ठिकाण मानले जात असले, तरी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर यांच्या प्रयत्नांमुळे आज ते परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. त्याचबरोबर नंदिनी नदीलगतच्या नाल्याला गॅब्रियन वॉल व जॉगिंग ट्रॅकची निर्मिती हा राज्यस्तरावर गाजलेला प्रकल्प ठरला. माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी मटालेनगर ते डीजीपी -नगर क्रमांक 2 दरम्यान मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून घेतले. माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी हेडगेवारनगर ते शिवशक्तीनगरला जोडणारा पूल नव्याने तयार केला. या सर्व कामांमुळे प्रभागातील पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत.

बंडखोरीचा धोका
भाजपकडून उमेदवारीसाठी मोठी चुरस असल्याने, पक्षात असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातून डावलले गेलेले काही इच्छुक बंडखोरी करून इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा सुरू आहे.

मतदारांचा कल कुणीकडे?

एकीकडे प्रभाग 25 ने विकासाचा नवा मापदंड गाठला असला, तरी नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत-2017 ते 2025 या आठ वर्षांत नेमके काय केले? प्रभागातील अपूर्ण रस्ते, बंद पडलेली सीसीटिव्ही व्यवस्था, रखडलेली पायाभूत कामे आणि वाहतूक कोंडी या सर्वच प्रश्नांवर आता नागरिकांनी जाब विचारायला सुरुवात केली आहे. आगामी काळात या प्रभागातील राजकीय समीकरणांबरोबरच प्रभागातील मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे

प्रभागाचा परिसर

रायगड चौक, पाटीलनगर, सावतानगर, उंटवाडी गाव, त्रिमूर्ती चौक, अभियंतानगर, इंद्रनगरी, हेडगेवारनगर, कामटवाडे गाव, श्रीरामनगर आणि सूर्योदय कॉलनी.

एकूण लोकसंख्या
52,308
अनुसूचित जाती 40029
अनुसूचित जमाती 1982

हे आहेत इच्छुक

माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, भाग्यश्री ढोमसे, प्रकाश अमृतकर, पवन मटाले, साधना मटाले, मुरलीधर भामरे, गणेश अरिंगळे, अनिल मटाले, किरण गाडे, तुषार सोळुंखे, सिमा सोळुंखे, शोभना शिंदे, अतुल सानप, सचिन कमानकर, आणि राम पाटील हे भाजपकडून इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक शामकुमार साबळे, नितीन अमृतकर ,छाया अमृतकर इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अमोल नाईक, कविता नाईक आणि मुकेश शेवाळे, तर शरदचंद्र पवार गटाकडून किरण शिंदे आणि अर्चना शिंदे इच्छुक आहेत. शिवसेना (उबाठा) कडून योगेश गांगुर्डे हे एकमेव इच्छुक आहेत. मनसेकडून अरुणा पाटील, राहुल पाटील, सचिन रोजेकर आणि नामदेव पाटील, तर काँग्रेसकडून देखील विजय पाटील हे एकमेव इच्छुक म्हणून पुढे आले आहेत.

प्रभागात झालेली विकासकामे
रस्त्याचे कॉक्रिटीकरण
जलकुंभ उभारणी
नाला बंदिस्त करुन जॉगिग ट्रॅक
मैदानांचे सुशोभीकरण

प्रभागातील समस्या

दिव्या अ‍ॅडलॅब ते संभाजी चौक उड्डाणपूल
त्रिमूर्ती चौक ते पवन नगर रस्ता
त्रिमूर्ती चौकातील भाजी बाजारामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी.
फ्री होल्डची समस्या
ठिकठिकाणी गतिरोधकांची गरज

नागरिक म्हणतात…

कॉलनी रस्त्यांवर खड्डे
दत्त मंदिर चौक ते पवननगर, तसेच काही कॉलनी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक वाहनचालकांना कमरेसह मानेचे आणि पाठीचे दुखणे जडले आहे.
– विलास मांडवगणे, त्रिमूर्ती चौक

गतिरोधकांची गरज

नागरिकांनी या प्रश्नांवर महापालिकेचे लक्ष वेधले आहे. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर होता, परंतु काँक्रीटीकरणानंतर तो सुटला आहे. मात्र वाढत्या वाहनवेगामुळे छोटे मोठे अपघात हे कायमचीच डोकेदुखी बनली असुन काही महत्वाच्या रस्त्यावरील वळणांजवळील फँनिंग साईज वाढवून गतिरोधक बसविण्याची आवश्यकता आहे.
– विजय सुर्वे

 

कॅमेरे कार्यान्वित नाहीत

या प्रभागात झालेल्या विकासकामांइतकीच अपूर्ण कामांची यादीही मोठी आहे. धन्वंतरी कॉलेज ते इंद्रनगरी दरम्यानचा 18 मीटर डीपी रोड अद्याप विकसित झालेला नाही. कोकण भवन ते इंद्रनगरी नाल्यापर्यंतचा रोडही बंद अवस्थेत आहे. बसविण्यात आलेले कॅमेरे कार्यरत नसल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
– देवा काजळे

अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

दत्त मंदिर ते त्रिमूर्ती चौक दरम्यान अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाबत ठरली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना उपलब्ध करुन दिलेल्या गाळ्यांसमोर मनपाच्या जागेवर पोटभाडेकरु टाकल्यामुळे याठिकाणी दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे
– प्रकाश कुरकुरे,

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी

कामटवाडे ते लेंडी नाला पुलापर्यंतचा रोड, तसेच कामटवाडे गावठाण आणि अभियंता नगर शिवा परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही. इंद्रनगरी आणि अभियंता नगरमधील अंतर्गत रस्त्यांच्या दर्जाबाबत नागरिक नाराजी व्यक्त करतात. काँक्रीट रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना एक फुटाचा गॅप राहिल्याने पावसाळ्यात पाणी साचते आणि रस्त्यांची अवस्था बिकट होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *