सुनेने प्रियकरासह रचले कटकारस्थान
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील वीर सावरकरनगर येथील दत्ताकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्या सरोज मोहन पवार यांच्या घरातून तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पवार यांच्या सुनेने तिच्या प्रियकरासह कटकारस्थान रचून घरातील दागिने लंपास केल्याचे समोर आले
आहे.
फिर्यादी सरोज पवार यांनी छावणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 9 जानेवारी 2025 ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यात 150 ग्रॅम वजनाची पट्टेवाली माळ (किंमत सुमारे 3 लाख), 40 ग्रॅम वजनाचे चेनचे मंगळसूत्र (2.40 लाख), 15 ग्रॅम वजनाच्या 22 कॅरेट सोन्याच्या बांगड्यांची जोड (90 हजार) आणि प्रत्येकी 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच अंगठ्या (1.50 लाख) असे मिळून एकूण 7.80 लाखांचे दागिने चोरीला गेल्याचे नोंदविण्यात आले आहे. तपासाअंती फिर्यादीची सून आणि तिचा प्रियकर प्रथमेश गौतम वानखेडे (वय 25, रा. काबरा विद्यालयाजवळ, मालेगाव) यांनी या चोरीत सहभाग घेतला.
आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी घरात ठेवलेले दागिने अपहार केल्याची माहिती मिळाली आहे. छावणी पोलिसांनी दोघांनाही 15 ऑक्टोबर रोजी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. सासू-सुनेतील नातेसंबंधांवर कलंक आणणार्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.