त्र्यंबकनगरीत पारदर्शक निवड प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शेकडो वर्षांच्या परंपरेने पंढरपूर पायी आषाढवारीसाठी 10 जून 2025 ला संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे प्रस्थान होत आहे. रविवारी (दि. 4 मे) संस्थानने राबवलेल्या बैलजोडी निवड प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तज्ज्ञ परीक्षकांनी बैलजोड्यांचे परीक्षण केले. त्याचा अंतिम निर्णय सोमवारी (दि. 5) सायंकाळी जाहीर होणार आहे.
श्री संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर संस्थान विश्वस्त मंडळाने यंदा आषाढवारी पायी पालखी सोहळ्यादरम्यान चांदीच्या रथाला जोडण्यात येणार्या बैलजोडीबाबत निवड करताना पारदर्शक प्रक्रिया संकल्पना राबवली. विश्वस्त मंडळाच्या आवाहनाला बैलजोडी मालकांंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्थानने जाहीर केलेल्या मुदतीत 12 बैलजोडीमालकांचे अर्ज दाखल झाले. रविवारी सकाळी त्यापैकी 9 बैलजोड्या सहभागी झाल्या. बैलांना सजवून आणले होते. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, माजी अध्यक्ष व विश्वस्त नीलेश गाढवे पाटील, हभप कांचनताई जगताप, नारायण बाबा मुठाळ यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ तसेच संस्थानचे व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाणे, मनोज भांगरे आदी उपस्थित होते. बैलजोडी निवडीसाठी माहीतगार असलेले तज्ज्ञ येथील विष्णुपंत गाजरे, चांदवडचे शिवाजी नाना शिंदे आणि विंचूरचे धनराज जाधव यांनी परीक्षण केले. त्यांच्यासमवेत संस्थानचे चोपदार निफाड येथील सागर दौंड
होते. यावेळी सहभागी प्रत्येक बैलाचे दात तपासून वय निश्चित करणे यांसह चालण्याचा व पळण्याचा सराव असल्याचे तपासून पाहणे, यासाठी येथे बैलगाडी सज्ज ठेवण्यात आली होती. म्हाळसादेवी मंदिरापर्यंत बैलगाडीला ओढण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. याबाबत अंतिम निर्णय सोमवारी सायंकाळी पाचला जाहीर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.