नाशिक ः प्रतिनिधी
इयत्ता दहावीचा राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसईचाही निकाल जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचा जिल्ह्याचा निकाल 95.38 टक्के, तर सीबीएसईचा पुणे विभागाचा 96 टक्के निकाल लागल्याने आता पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे.
पारंपरिक शाखांसह अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्लोमा) शिक्षणक्रमांकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार नाशिक विभागात डिप्लोमाच्या 24,680 आणि नाशिकमध्ये 8,926 हजार जागा उपलब्ध आहेत. अद्याप प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नसून, साधारणतः 15 मेनंतरच त्याबाबत अधिसूचना निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दहावीनंतर करिअरचे विविध पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नेमके भविष्यात काय करायचे यादृष्टीने बहुतांश विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडण्यास अधिक प्राधान्य देतात. त्यासाठी दहावीनंतर आता कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त अभ्यासक्रमासह तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक), आयटीआय या विविध बाबींचे पर्याय आहेत. यात पॉलिटेक्निकला विविध शाखांना दहावीनंतरच प्रवेश दिले जातात. तीन वषार्ंचा डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लागलीच विविध कंपन्यांत नोकरीच्या संधीही उपलब्ध असतात. त्यानंतर अभियांत्रिकी पदवी करावयाची असल्यास थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा असते. या शिक्षणक्रमाची प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविले जाते. विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची सज्जता ठेवावी. जेणेकरून प्रक्रिया सुरू होताच नोंदणी करून ऐनवेळी धावपळ टाळता येईल. दुसर्या बाजूने प्रवेश प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय तंत्रनिकेतसह खासगी डिप्लोमा महाविद्यालयांतही तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. केवळ प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.
कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांकडे वाढता कल
दहावीनंतर कौशल्याधिष्ठित शिक्षणक्रम असलेल्या आयटीआयकडेही गेल्या काही वर्षांत वाढता प्रतिसाद आहे. नाशिक विभागात 15,224 जागा आहेत. गतवर्षी 14,154 म्हणजे 92 टक्के प्रवेश झाले होते. त्यामुळे यंदाही चांगला प्रतिसाद राहण्याची शक्यता आहे. कारण शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विविध कारखाने, कंपन्यांशी टायअप झाल्याने अन् नव्या शैक्षणिक धोरणात अभ्यासासोबतच प्रशिक्षण अर्थात, ऑन जॉब ट्रेनिंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचाही आयटीआयकडे कल वाढला आहे. नाशिकमध्ये जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक जागा आहेत.