नाशिक : प्रतिनिधी
उत्तरेत सलग आलेल्या पश्चिमी चक्रावातामुळे वातावरणात बदल झाला होता. उत्तरेतील राज्यामध्ये पावसासह बर्फवृष्टी होत असल्याने थंडीचे प्रमाण हे कमी झाले होते. तर महाराष्ट्रात देखील शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. तर १ फेब्रुवारीपासून आकाश हे स्वच्छ व निरभ्र राहणार असल्याने किमान आणि कमाल तापमानात घसरण होऊन थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
अफगाणीस्थानातून येत असलेल्या पश्चिमी च्रकावातामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यामध्ये जोरदार पावसासह बर्फवृष्टी सुरू होती. त्यामुळे पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते.
तसेच महाराष्ट्रात देखील कोकण वगळता अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमान हे २० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने थंडी ही गायब झाली होती. तर रविवारी निफाड, धुळे, औरंगाबाद, बारामती, पुणे, नाशिक, सातारा येथे किमान तापमान हे १२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले होते. तसेच राज्यात ३० जानेवारीपासून आकाश स्वच्छ व निरभ्र होणार असल्याने किमान व कमाल तापमानात हळूहळू घसरण होणार आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
असे होते राज्यातील किमान तापमान
निफाड ९.७, औरंगाबाद १०.९, बारामती ११.४, पुणे १२.२. नाशिक १२.६, सातारा १२.९, धुळे १३.०, महाबळेश्वर १४.२, जळगाव १४.५, उस्मानाबाद १५.४, परभणी १५.६.