नाशिकरोड : प्रतिनिधी
पळसे येथे काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास काही शेतकर्यांच्या शेतात बिबट्याची जोडी मुक्त संचार करीत असल्याचे शूटिंग तरुण शेतकर्यांनी केले असून, रात्री दिसणारा बिबट्या आता दिवसाही फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
नाशिकरोड शहरापासून अगदीच हकेच्या अंतरावर असणार्या पळसे गावातून जाणार्या जुना नासाका रस्त्यालगत असणार्या शेतकर्यांच्या शेतात सोमवारी सकाळी भाऊसाहेब जाधव, शरद गायधनी आणि गणेश गायधनी यांच्या गव्हाच्या पिकातून बिबट्याची जोडी अचानक फिरताना दिसून आली.
यावेळी एका शेतकर्याची नजर बिबट्यावर गेल्याने त्याने तात्काळ मोबाइलच्या सहाय्याने शूटिंग केले. यावेळी एका पाठोपाठ दोन बिबटे असल्याने या भागातील शेतकर्यांमध्ये भीती पसरली असल्याने सोमवारी दिवसभर त्या परिसरात कोणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकर्यांची शेतीची कामे रखडली होती.पळसे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात शेती असल्याने तसेच बाजूला दारणा नदी असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी कधी सर्व्हिस रोड लगतच्या झाडाझुडपात तर कधी थेट रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होते. बिबट्यांना लपण्यासाठी जागा आणि पिण्यासाठी मुबलक पाणी असल्याने या ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वीही गणेश गायधनी यांच्या मळ्यात बिबट्या आढळून आला होता. याबाबत वनविभागाच्या कर्मचार्यांना कळविण्यात आले असून, पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
वाढत्या संख्येवर आवर घालावा
“बिबट्या हा वन्यजीव प्राणी असून, त्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांचे निर्बीजीकरण करून वाढत्या संख्येवर आळा घालण्याची गरज असून, रात्रीच्या वेळी हातात काठी घेऊन शेतात गेले पाहिजे.
– गणेश गायधनी, शेतकरी