ठिबक सिंचन करत जगवली 600 चिंचेची रोपटी

वृक्षसंवर्धनासाठी सरसावली वडांगळी ग्रामपंचायत

सिन्नर : प्रतिनिधी
उन्हाच्या दाहकतेमुळे दीड-दोन वर्षांपूर्वी लागवड केलेली चिंचेची रोपटी कोमेजू लागली. त्यातच सातत्याने पाणी देणे शक्य नसल्याने ऐन उन्हाळ्यात ती जळण्याची भीती असल्याने वडांगळी ग्रामपंचायतीने ठिबक सिंचन प्रणाली बसवून चिंचेची 600 हून अधिक रोपटी जगविली.
साधारणतः दीड-दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच मीनल खुळे यांनी शिवारात मोठ्या प्रमाणावर चिंचेची झाडे लावली. ग्रामपंचायतीच्या गटात सुमारे 600 चिंच झाडांची लागवड एकाच ठिकाणी करण्यात आली. ही झाडे जगविण्यासाठी ग्रामपंचायत मनरेगा योजनेंतर्गत मजुरांमार्फत या झाडांना पाणी देत असे. तथापि, मजूर वेळेत येत नसत. शिवाय, एकाच वेळी एवढ्या झाडांना पाणी देताना मजुरांच्याही नाकीनऊ येत असे. त्यामुळे मजुरांनी याकडे पाठ फिरवल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी शक्य होईल तेव्हा टँकरद्वारे पाणी देऊन झाडे जगविण्याचा प्रयत्न करू लागले. तथापि, टँकरद्वारे पुरेसे पाणी देण्यात अडचणी येत होत्या. दुसर्‍या बाजूला उन्हाची प्रचंड तीव्रता असल्याने झाडे कोमेजू लागली. झाडांचे खोड मजबूत झालेले असल्याने ही झाडे फक्त पाण्याअभावी जळू नये यासाठी पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याचा विचार ग्रामपंचायत सदस्यांनी मांडला. त्यासाठी सूक्ष्मसिंचनाद्वारे झाडांना पाणी देण्याचा निर्णय सरपंच नानासाहेब खुळे यांनी घेतला.
त्यासाठी उपसरपंच अनिता क्षत्रिय यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी योगेश चित्ते यांनी त्यांच्या निर्णयास समर्थन दिले. ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश कहांडाळ यांच्यासह अमोल अढांगळे, सुका अढांगळे, संजय अढांगळे या कर्मचार्‍यांनी ठिबक सिंचन यंत्रणा जोडण्यास मदत केली. त्यातून झाडांना दररोज दोन तास थेंब-थेंब पाणी मिळू लागले. सरपंच खुळे यांना उपसरपंच अनिता क्षत्रिय, सदस्य योगेश घोटेकर, राहुल खुळे, अमोल अढांगळे, रवी माळी, मीनल खुळे, गायत्री खुळे, योगिता भावसार, लता गडाख, हर्षदा खुळे आदींनी सहकार्य केले.

परिसर दिसू लागला हिरवागार...

वडांगळी-तामसवाडी रस्त्यालगत चिंचेची 600 झाडे लावण्यात आली आहे. ठिबक सिंचन प्रणाली बसविण्याच्या अगोदर ही झाडे कोमेजू लागली होती. मात्र, ही प्रणाली बसविल्यानंतर झाडांना पालवी फुटून ही झाडे कडक उन्हाळ्यातही तजेलदार दिसण्याबरोबरच हा परिसर हिरवागार दिसू लागला आहे. या बाजूने ये-जा करणार्‍यांचे लक्ष आपोआपच वेधले जात आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

ग्रामपंचायतीचे सरपंच नानासाहेब खुळे व त्यांच्या सहकार्‍यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चिंचेच्या झाडांना जगविण्यासाठी सरपंच नानासाहेब खुळे व त्यांच्या सहकार्‍यांनी झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला. यामुळे झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. शिवाय, पाण्याची बचतही होत आहे.
-सुदेश खुळे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *