मंगल कार्यालयातून दागिने चोरणारा चोरटा जेरबंद

तीन लाख 78 हजारांंचा मुद्देमाल हस्तगत

सिडको : विशेष प्रतिनिधी

सातपूर परिसरातील पपया नर्सरी नजीक असलेल्या सौभाग्य मंगल कार्यालयात

20 मे रोजी झालेल्या लग्न समारंभात वधू पक्षाच्या खोलीत घुसून अनोळखी

व्यक्ती सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाली होती.

या चोरट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

या चोरीच्या घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट-2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. जवळपास 45 वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयित आरोपीचा मागोवा घेण्यात आला. तपासात ही व्यक्ती मोपेडवर येऊन कार्यालयात प्रवेश करताना आणि दागिने चोरून जाताना आढळली.
खबर्‍याच्या माहितीवरून आरोपी निमा हाउसकडून स्वारबाबानगरकडे जाणार्‍या रस्त्यावर आयटीआयच्या मागे, भिंतीलगत एका मोपेडवरून येणार असल्याचे पोलिसांना समजले. यावरून पोलिस उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक केली. आरोपीचे नाव प्रशांत देवानंद राणे (वय 34, रा. ओम कॉलनी, जुने धुळे, सध्या रा. सातपूर, नाशिक) असे आहे. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली मोपेड असा तीन लाख 78 हजारांंचा मुद्देमाल हस्तगत केला. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा युनिट – 2 चे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, हवालदार सुनील आहेर, तेजस मते, मुक्तारखान पठाण, बाळू शेळके, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, मनोहर शिंदे, प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार, जितेंद्र वजिरे, तांत्रिक विश्लेषक जया तारडे यांच्यासह पथकाने मेहनत घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *