ठाणगावात चोरी करणारा चोरटा गजाआड

सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

सिन्नर ः प्रतिनिधी
तालुक्यातील ठाणगाव येथे घराच्या बंद दरवाजाची कडी उघडून तीन लाख 76 हजारांचा ऐवज चोरून नेणार्‍या चोरट्याला सिन्नर पोलिसांनी ठाणगावात सापळा रचत गजाआड केले. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. समाधान भाऊसाहेब काकड (वय 23, रा. ठाणगाव, ता. सिन्नर) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ठाणगाव येथे जयश्री अनिल केदार यांच्या घराच्या दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश करत कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या रोख रकमेसह 4 तोळ्यांची सोन्याची पोत, सहा ग्रॅम कानातील सोन्याच्या रिंगा, तीन ग्रॅमचे टॉप्स, असा ऐवज चोरून नेला होता.
याबाबत जयश्री केदार यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकातील अंमलदार व बीट अंमलदार यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. याचदरम्यान पोलिसांना खबर्‍यामार्फत ठाणगाव येथे जयश्री अनिल केदार यांच्या घरी चोरी करणारा चोरटा ठाणगाव परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. यावरून तपासी पथकाने ठाणगाव येथे सापळा रचून समाधान भाऊसाहेब काकड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने जयश्री केदार यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी समाधान काकडकडून तीन लाख 57 हजार रुपये किमतीची 40 ग्रॅम 20
मिलिग्रॅम वजनाची सोन्याची लगड व 19 हजार रुपये रोख, असा एकूण तीन लाख 76 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार बीट अंमलदार निवृत्ती गिते, गुन्हेशोध पथकातील पोलिस हवालदार समाधान बोराडे, आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पुढील तपास हवालदार निवृत्ती गिते करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *