लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत

माडसांगवी : वार्ताहर
लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या ग्रामस्थांतर्फे लाखलगाव येथे स्थानिक पोलीस चौकीची मागणी करण्यात आली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून चोरांचा वाढता उपद्रव हा शेतकरी वर्गासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. दिवसभर शेतात कामे व रात्रीच्या वेळी चोरांमुळे खडा पहारा यात शेतकरी अक्षरशः वैतागून गेले आहेत. रात्रीच्या वेळी बंद घरांच्या कड्या वाजवणे व दरवाजे वाजवणे, असे प्रकार सुरू आहेत.
तानाजी पोपट वस्ती, जाधववाडी, दराडे वस्ती, शिव रोड, सूर्यभान कांडेकर, निरगुडे वस्ती, चिखले वस्ती येथे गोपीनाथ चिखले व गणेश चिखले यांचे दरवाजे वाजवून चोर पळून उसात लपताना काही ग्रामस्थांनी पाहिले, परंतु ग्रामस्थ जमा होईपर्यंत हे चोर पसार झाले.
गावातील वयोवृद्ध लोक, लहान मुले व महिलांनी अक्षरशः या चोरांची धास्ती घेतली आहे. रात्रीप्रमाणे दिवसादेखील घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देऊन बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. नवनाथ कांडेकर, उपसरपंच प्रदीप कांडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी पोपट जाधव, देवळाली विधानसभा अध्यक्ष गोकूळ कांडेकर, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष रामभाऊ जाधव, सोमनाथ निरगुडे, कैलास कानडे आदी ग्रामस्थांनी आडगाव पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे ए.पी.आय जगदाळे व ए.पी.आय. काळे यांना याबाबत निवेदन दिले आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

चोख बंदोबस्त करावा

गावातून चोरांचा चोख बंदोबस्त करावा, यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संबधितांंना नुकतेच देण्यात आले. गावात पोलीस चौकी असावी, याबाबत गावात मागणी जोर धरू लागली आहे. गावातील लोकांचे मत आहे की, या चोरांना स्थानिक भुरटे चोरही सहभागी असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *