साखरपुड्यातून चोरीला गेलेला ऐवज मध्य प्रदेशातून हस्तगत

आडगाव पोलिसांचे यश

पंचवटी : प्रतिनिधी
तपोवनातील स्वामीनारायण हॉलमधून साखरपुड्याच्या कार्यक्रमातून चोरीला गेलेला नागपूरमधील महिलेचा साडेबारा लाखांचा ऐवज मध्य प्रदेशातील बोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हस्तगत करण्यात आडगाव पोलिसांना यश आले आहे. यातील आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा शेषराज निर्वाण (52 वर्षे, दिघोरी, ता. जि. नागपूर) यांचा मोठा मुलगा सौरभ याचा 6 नोव्हेंबरला तपोवनातील स्वामीनारायण हॉलमध्ये साखरपुडा होता. या कार्यक्रमात व्यस्त असताना पर्स चोरीला गेली. पर्समध्ये 25 हजारांची रोकड, सोन्याचे मंगळसूत्र, चपला कंठी हार असा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासास प्रारंभ केला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांनी विवाहसोहळ्यातील चोरीच्या घटनांबाबत मार्गदर्शन करून आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील यांना सूचना दिल्या. त्यानुसार सीसीटीव्ही
फुटेजचे निरीक्षक करण्यात आले.
यादरम्यान आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सतीश जगदाळे, हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, मनोज परदेशी, दीपक भुजबळ, रवींद्र लिलके यांनी मध्य प्रदेशातील बोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीचे घर शोधले. आरोपी घरी सापडला नाही, मात्र नातेवाइकांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी 12 लाख 50 हजार रुपये किमतीचे 125 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.

कर्मचार्‍यांचा आयुक्तांकडून गौरव

आडगाव पोलिसांनी सोन्या-चांदीच्या चोरीप्रकरणी 12 लाख 50 हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते आडगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा प्रशंसापत्र देऊन गौरव केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *