शिवडी शिवारात चोरट्यांचा द्राक्षांवर डल्ला

शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण; भुरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

निफाड ः तालुका प्रतिनिधी
सोने-चांदी, वाहने, घरफोडीनंतर चोरट्यांनी आता आपला मोर्चा द्राक्षबागांकडे वळविल्याचे दिसते. रविवारी (दि. 1 मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शिवडी-निफाड रस्त्यालगत असलेल्या क्षीरसागर यांच्या द्राक्षबागेतील द्राक्षे चोरून नेली. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. निफाड पोलिसांनी या भुरट्या चोरट्यांवर वचक प्रस्थापित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सविस्तर वृत्त असे की, पावसाने दीर्घकाळ हजेरी लावल्याने त्याचा थेट परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. यंदा जिल्ह्यात जवळपास 90ट क्के द्राक्षबागांना फळधारणा झालेली नाही. त्यामुळे वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे द्राक्षमालाला मागणी वाढल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारपेठेत द्राक्षाला 200 ते 300 रुपये किलोचा दर मिळत आहे.आगामी काळात हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बाजारात द्राक्षटंचाई विचारात घेता चोरट्यांनी आता मोर्चा द्राक्षमालाकडे वळविण्याचे दिसत आहे. निफाड- शिवडी रस्त्यालगत राहणारे व तेथेच द्राक्षे असताना चोरट्यांनी महेश क्षीरसागर यांच्या बागेतील द्राक्षे खुडून पलायन केलेे. चोरटे द्राक्षमाल खुडत असताना परिसरातील नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी द्राक्षमाल घेऊन धूम ठोकली. विशेष म्हणजे, या घटनेच्या एक दिवस अगोदर लोणवाडी शिवारात पवनसुतनगरात तीन महिलांना द्राक्ष खुडताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याकडून 40 किलो द्राक्षे जप्त केली. यंदा द्राक्षपीक अत्यल्प आल्याने बाजारभावात मोठी वाढ झाल्याने चोरट्यांनी आता आपला मोर्चा द्राक्षबागांकडे वळविल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी द्राक्ष हंगाम विचारात घेऊन रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सध्या द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने द्राक्षमाल चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वच भागांत वाढले आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकर्‍यांनी द्राक्षाचे उत्पादन घेतले असल्याने आपल्या मालाचे संरक्षण व्हावे, यासाठी शेतकर्‍यांनी द्राक्षबागेत सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच लाइट लावावेत. परिसरात अनोळखी अथवा संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी.
– गणेश गुरव, पोलीस निरीक्षक, निफाड

Thieves raid grapes in Sewri Shivara

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *