चोरट्यांचे पोलिसांपुढे आव्हान; एकाच रात्रीत आठ घरफोड्या
सटाणा : प्रतिनिधी
शहर व परिसरात एकाच रात्री आठ ठिकाणी घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोड्या केल्या. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील भाक्षी रोड, फुलेनगर परिसरातील राजेंद्र अहिरे आठ दिवसांपासून नातेवाइकाचे अपघाताने निधन झाल्याने बाहेरगावी गेलेे होते. त्यांच्या घरात 5 मे रोजी कन्येचा विवाह झाला असल्याने त्यांनी घरातील लोखंडी कोठीत विवाहाचे दागिने व मिळालेल्या आहेराची रोकड, असे सुमारे दोन लाख रुपये ठेवले होते. चोरट्यांनी ते लंपास केले. यात पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, 30 नग सोन्याचे मणी व 80 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास करत चोरटे पसार झाले. त्याचबरोबर शहरात वास्तव्यास असलेल्या सायली जाधव, लोभानसिंग पवार, जिभाऊ खैरणार, सचिन भालेराव या पाचही व्यक्तींच्या घरांना कुलूप होते. या पाचही घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून ऐवज लांबवला, तर काही ठिकाणी काहीही न मिळाल्याने रिकामे हाताने
परतावे लागलेे.
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यशवंतनगर परिसरातील मदन शेवाळे, वाल्मीक
देवरे व अण्णा कुमावत यांच्या घरांचे बंद कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मात्र, घरात काहीही आढळून न आल्याने त्यांना मोकळ्या हाताने परतावे लागले. या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले. सुमारे पाच व्यक्ती रात्रीच्या सुमारास दिसल्या आहेत. सायंकाळी उशिरा नाशिक येथून श्वान पथकास पाचारण केले होते. श्वान पथकाने ताहाराबाद रोडकडे माग दाखविला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत.