आरोग्य उत्तम राहावं म्हणून काही लोक पथ्य पाळतात. थोडक्यात काय शरीराला ज्या गोष्टी अपाय करतील, त्या गोष्टी आहारातून वगळतात. आपल्या शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण योग्य ती काळजी घेतो. ज्या गोष्टी आपल्याला घातक आहेत. त्या गोष्टी आपण सेवन करायचं टाळतो.
काही व्यक्ती ह्या कुणाच्यातरी आठवणीत काही गोष्टी सोडतात. म्हणजेच काय की त्या व्यक्तीचा कधीच विसर पडू नये, म्हणून काही गोष्टी आपलं मनच ठरवुन टाकते. तसं तर विसरणे काहीच शक्य नाही.
व्यक्तींनी जरी आपल्याला सोडलं किंवा त्यांचा अस्तित्व जरी संपलं किंवा त्या सोडून निघून गेल्या तरी त्यांच्या आठवणी आपला पाठलाग सोडत नाही. त्या सदैव आपल्याबरोबर असतात. त्यांना सोडता येत नाही. आठवणी मनाच्या कपाटात सदैव सुरक्षित असतात. आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो. आठवणी चिरतरुण असतात.
आयुष्यात जीवन जगताना सोडण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. त्यांचं आपण मोजमापही करू शकत नाही. कुणाचा विक्षिप्त वागणं जर कुणी मनाला लावून घेतल तर त्रास होतो, पण तो विचार सोडल्यास त्रास होत नाही.
जिथं माणसं ओळखण अवघड होऊन बसते. तिथे स्वतःला ओळखलेलं जास्त चांगलं. इतरांना ओळखण्याची गोष्ट सोडल्यास आयुष्य जगणं नक्की थोडसं सुखकर होईल. यात काही शंकाच नाही.
दुसऱ्याला ओळखण्यात वेळ, शक्ती भावना इ. खर्च करण्यापेक्षा या सर्व गोष्टी स्वतः वर खर्च केल्यास नक्कीच आपलं काही नुकसान होणार नाही. झाला तर फायदाच होईल.
जीवन जगताना काय सोडायचं, काय नाही, कुठली गोष्ट सोडली, तर आपल्याला फायदा होईल? याचा विवेक सगळ्यांनाच करता येत नाही. किंवा ती सद्विवेक बुध्दी सगळ्यांकडे असेलच असं नाही.
त्यासाठी वैचारिक दृष्टिकोन व्यापक असावा लागतो. मानसिक प्रगल्भता असावी लागते. सोडायच्या गोष्टी कुठल्या हे सर्वांनाच समजत नाही. आणि समजले तर निर्णय क्षमता कमी पडते. काहीतरी उदात्त करण्यासाठी आत्मनिश्चय सोडून चालत नाही. तो अतुट असावा लागतो.
आयुष्याच्या प्रवासात अनेक गोष्टी सोडाव्या लागतात. माणसाचा प्रवास कसा आहे. यावर या गोष्टी अवलंबून असतात. वाईट प्रवृत्ती कडून चांगल्या प्रवृत्तीकडे जाताना मार्गात अनेक गोष्टी सोडाव्या लागतात.
तसेच चांगल्या प्रवृत्ती कडून वाईट प्रवृत्तीकडे जाताना ही अनेक चांगल्या गोष्टी माणसाच्या हातातून सुटतात.
चांगल्या अथवा वाईट ज्या त्या गोष्टी सोडल्यास जो तो परिणाम माणसाला स्वीकारावा लागतो, भोगावाही लागतो.
जी व्यक्ती आयुष्यात चांगल्या गोष्टी अथवा व्यक्तीचा किंवा चांगले विचार, भावना यांचा त्याग करते. त्यांना सगळी सुख मिळाली तरी मनःशांती मिळते नाही. समाधानी असण्याची भावना त्यांच्या हृदयाला शिवत नाही.
अंहकार सोडला तर ईश्वरी कृपा प्राप्त होते, राग द्वेष सोडला तर सद्विवेक बुध्दी मिळते. लोभ सोडला तर मनःशांती मिळते, दुष्ट संगती सोडली तर आत्मविकास साधता येतो.
आयुष्याच्या प्रवेशद्वारात शिरायचंय पण कसं? या प्रवासात काय सोडायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मग तुम्ही आयुष्याच्या प्रवासात अन् जीवनाच्या प्रवेशद्वारात शिरताना नक्की काय सोडताय?
©सौ. श्रध्दा जाधव बोरसे