महाविकास आघाडीचे तीनतेरा : ना. महाजन यांची टीका
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील जनता कॉंग्रेसला कंटाळली, शिवसेनेत दहा-बारा आमदार राहिले. महाविकास आघाडीचे तीनतेरा वाजले आहेत. या तिन्ही पक्षांतून कोण केव्हा बाहेर पडेल हे काहीही सांगता येणार नाही. तसेच राज्यात लवकरच कॉंग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होईल. त्याची सुरुवात कॉंग्रेसमध्ये दोन गट पडून झाली आहे, असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
महाविकास आघाडीतले दहा ते 20 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असे विधान शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांनी केले होते. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, आता राज्यात काहीही होऊ शकते.
येणार्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राहते की नाही? तसेच निवडणूक लढवण्याचा तिन्ही पक्षांचा वेगवेगळा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्यांची फक्त गंमत पाहतोय. पुढे ते म्हणाले की, आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते. कारण, कॉंग्रेसमध्ये आत्ताच दोन गट पडलेत, कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात एक गट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते कॉंग्रेसला कंटाळलेत. राज्यातील महाविकास आघाडीचे तीनतेरा वाजले असून, कोण केव्हा बाहेर पडेल हे सांगता येत नाही. महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होईल, असे मत महाजन यांनी व्यक्त
केले.