दोघा तोतया पोलिसांच्या आवळल्या मुसक्या
नाशिक : प्रतिनिधी
तब्बल तीस किलोमीटरचा फिल्मी स्टाइल पाठलाग करत पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या दोघा तोतया पोलिसांना जेरबंद करण्यात अंबड गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या दोन्ही सराईत तोतया पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे करत नागरिकांना गंडा घातला आहे. त्यांच्याकडून 30 लाख रुपयांचे 201 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांत 58 गुन्हे आहेत. काल पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत या गुन्हेगारांची कुंडलीच मांडण्यात आली. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून तोतया पोलिसांनी मोठा उच्छाद मांडला होता. यासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 2) किशोर काळे व सहायक पोलीस आयुक्त (अंबड विभाग) सचिन बारी यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार 22 फेब्रुवारी 2026 रोजी अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हेशोध पथक नियमित गस्त घालत असताना पाथर्डी फाटा परिसरात मोटारसायकलवरून फिरणारे दोन संशयित आढळले.
पोलीस अंमलदार मयूर पवार यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. संशयितांनी मुंबई-आग्रा महामार्गावरून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. तीस किलोमीटरपर्यंतचा हा थरारक फिल्मी स्टाइल पाठलाग सुरू होता. ओझर येथील उड्डाणपुलावर या दोघांना घेरण्यात आले. यावेळी पोलिसांशी इटापट करण्याचा प्रयत्न या दोघा आरोपींनी केला. मात्र, पोलिसांनी या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
यावेळी त्यांच्या ताब्यातून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. अमजद अली अकबर अली बेग (वय 47, रा. भिवंडी, जि. ठाणे) व फयाज इम्तियाज अन्सारी (वय 28) अशी या दोघा तोतया पोलिसांची नावे आहेत.
सीसीटीव्हीचे विश्लेषण
या कारवाईत सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपींची हालचाल, वाहन, कपडे व देहबोलीचा अभ्यास करण्यात आला. त्याआधारे ओळख पटवून अटक करण्यात यश आले.
Thirty kilometer film style chase