सत्ताधार्‍यांनी केवळ स्वत:चा विकास साधला

उपमुख्यमंत्री शिंदे ः इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर सभा

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी नगरपरिषदेवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचाच नगराध्यक्ष निवडून द्या व आपल्या गावाचा विकास साधा. विकासाच्या पत्रावर झटपट सह्या करणारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून माझे नाव सर्वांना माहीत आहे. गेली 30 वर्षे ज्यांच्या हातात इगतपुरीची सत्ता दिली त्यांनी नागरिकांचा विकास न करता स्वतःचा विकास करून येथील नागरिकांना देशोधडीला लावले, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
राज्यातील नगरविकास विभाग माझ्याकडे असून, इगतपुरीचा विकास करण्यासाठी मंत्रीदेखील उपस्थित आहे. आमदार हिरामण खोसकर इगतपुरीकरांच्या सोबत आहेत. लाडकी बहीण योजना सुरू असून, काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार शालिनी खातळे यांच्या प्रचारासाठी इगतपुरी येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले की, ब्रिटिशांनी महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण म्हणून मान्यता दिल्यानंतर अद्याप कुठेच थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषणा केली नाही. मात्र, मी तुम्हाला शब्द देतो की, महाबळेश्वरनंतर इगतपुरीला थंड हवेचे ठिकाण म्हणून मान्यता देऊन इगतपुरीला पर्यटनाचा दर्जा देऊन प्रचंड रोजगार उपलब्ध करून देऊ.
आडवण येथे लवकरच महिंद्रा कंपनीचा प्लँट आणण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणे झाले असून, बेरोजगारी दूर केली जाईल. इगतपुरी शहराचा विकास पाहिजे असेल तर सर्व उमेदवारांना निवडून द्या. शब्द देतोय स्वच्छ इगतपुरी- सुंदर इगतपुरी आणि विकसित इगतपुरी करण्यासाठी माघार घेणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला. यावेळी नगराध्यक्षांसह नगरसेवकपदाचे सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, अ‍ॅड. संदीप गुळवे, ज्ञानेश्वर लहाने, संजय खातळे, विनायक पाटील, रघुनाथ तोकडे, देवीदास जाधव, पांडुरंग वारुंगसे, श्रीराम लहामटे यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *