गणेशोत्सवातील राजकीय उत्सव
नाशिक : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली जात आहे.
गेल्या साडेतीन वर्षांपासून लांबलेल्या मनपा निवडणुकीमुळे राजकीय पक्ष निवडणुका कधी होणार याकडे लक्ष देऊन आहेत. त्यातच मनपा निवडणुकीस अवघे काही महिने बाकी असून, निवडणुका लवकरच लागतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे. त्यातच अनेक राजकीय विश्लेषकांकडून मनपा निवडणुका दिवाळीनंतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इच्छुकांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मुहूर्त साधला जाणार आहे. परिणामी यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या वाढली आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत पडलेल्या फुटीमुळे सध्या राजकारणात ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, मोठ्या पवारांची राष्ट्रवादी, छोट्या पवारांची राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, मनसे असे प्रमुख पक्ष असल्याने सार्वजनिक मंडळांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच प्रत्येक जण मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळातील दहा दिवस सत्कारणी लावणार असल्याचे चित्र आहे.
परिणामी यंदा शहरात गणेशोत्सव दिमाखदारपणे उत्साहात साजरा होईल. इच्छुकांकडून बाप्पाच्या आशीर्वादानेे निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचा
प्रयत्न करण्यात येत असला, तरी बाप्पाचा आशीर्वाद नेमका कोणाच्या पारड्यात पडणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
गणेश मंडळांना राजकीय टच
सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात देखावे साकारण्यात येणार आहेत. देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता राजकीय पक्षांच्यावतीने स्थापन केलेल्या गणेश मंडळांच्या पोस्टरवर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांचे फोटो झळकत आहेत.