गोदावरी नदीपात्रात हजारो मासे मृत

आसारामबापू पुलाजवळील प्रकार; दूषित पाण्याचा परिणाम

नाशिक/सातपूर : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 8 मधील आसारामबापू पूल येथील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने परिसरात दुर्गंधी पसरली असून, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. बापू पूल नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे. त्याच परिसरात एका ड्रेनेज लाइनचे दूषित पाणी नदीमध्ये मिसळत असल्याने हे मासे मृत झाल्याचा आरोप प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेविका उषा बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे यांनी केला आहे.
लहान व मोठे मासे याठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी या सर्व प्रकाराची पाहणी केली. या दूषित पाण्याचे नमुने मत्स्यालय विभागाने जमा करून पुढील पंचनामा करत आहेत. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि नाशिककर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून नदीपात्रात दूषित पाणी नाल्यांमधून थेट नदीपात्रात मिसळत आहे. नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. हजारो मृत माशांचा खच नदीपात्रात येऊन पडला आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन कमी होत चालल्याने मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. वर्षभरापूर्वी संबंधित प्रशासनाच्या वतीने महानगरपालिकेला काही दिवसापूर्वी याच प्रकरणात एका दिवसाला दहा लाख रुपये दंड आकारण्याचे पत्र प्राप्त झाले होते. मात्र, एवढं होऊनदेखील संबंधित प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
नगरसेविका उषा बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, अ‍ॅड. महेंद्र शिंदे, दीपक आरोटे, दशरथ लोखंडे, हिरामण बेंडकोळी, शरद बेंडकुळे, पोपट मंडलिक, कैलास आचारी, भरत मंडलिक, किरण मंडलिक मत्स्यालय क्षेत्र अधिकारी मनीष महाजन, महापालिका उपायुक्त अजित निकत, घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉ. आवेश पलोड, चिंतामण पवार, मुकेश रेवर, पर्यावरणप्रेमी राजेश पंडित घटनास्थळी दाखल झाले होते.

Thousands of fish dead in Godavari river basin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *