दोन नगरसेवक बिनविरोध; नगराध्यक्षपदासाठी 7 तर नगरसेवकासाठी 32 उमेदवारांची माघार
सटाणा ः प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी वेगवान आणि नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण तापले. दबावतंत्रासह झालेल्या जलद हालचालींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना दिनेश सोनवणे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या माघारीनंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण 7 उमेदवारांनी माघार घेतली असून, आता भाजप, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार यांच्यात थेट सामना रंगणार आहे. भाजपाच्या तिकिटावर दावा करणार्या रूपाली परेश कोठावदे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे भाजपाच्या योगिता सुनील मोरे, शिवसेनेच्या हर्षदा राहुल पाटील आणि अपक्ष कोठावदे यांच्यात तिरंगी मुकाबला होणार आहे.
दरम्यान, नगरसेवकपदासाठीही मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. दाखल झालेल्या उमेदवारांपैकी 32 जणांनी माघार घेतल्याने एकूण 74 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. यातील सर्वांत मोठी घडामोड म्हणजे दोन भाजप उमेदवारांचे बिनविरोध निवडून येणे. प्रभाग क्रमांक 11 मधून नितीन काका सोनवणे व प्रभाग क्रमांक 4 मधून संगीता देवेंद्र सोनवणे यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने दोन्ही भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निश्चित झाले. निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच जोरदार जल्लोष केला.
सटाणा पालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे राहिल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याचे संकेत आधीच होते. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या माघारीनंतर वातावरणाला नवा कल मिळाला आहे. आगामी दिवसांत प्रचार तापणार असून, तिरंगी लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होत आहे.