कर्मभूमी रेल्वेतून तिघे पडले; दोन मृत, एक गंभीर

कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे पडले; दोन मृत, एक गंभीर
सिडको विशेष प्रतिनिधी : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून रकसोल (बिहार)कडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून नाशिक रोडजवळ तिघे युवक खाली पडल्याची भीषण घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवार रात्री पावणे नऊ वाजता कर्मभूमी एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकातून न थांबता पुढे गेली. काही वेळातच ओढा स्टेशनचे प्रबंधक आकाश यांनी नाशिक रेल्वे विभागाला माहिती दिली की ढिकलेनगर, जेल रोड परिसरात तिघे युवक गाडीखालून पडले आहेत. ही माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी, हवालदार भोळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवर, किलोमीटर १९०/१ ते १९०/३ दरम्यान, दोन युवक मृतावस्थेत तर एक युवक गंभीर अवस्थेत आढळला. जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मृत व जखमी युवकांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. गर्दीमुळे गाडीतून पडून अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून नाशिक रोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *